पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज कर्नाटक आणि तामिळनाडूतील जंगल सफारीचा आनंद घेतला. आज कर्नाटकातील 'प्रोजेक्ट टायगर'ला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशातील वाघांबद्दलही माहिती दिली. तसेच, जंगल सफारीच्या दौऱ्यात ऑस्कर विजेती डॉक्युमेंटरी 'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) मधील बोमन आणि बेली या जोडप्याचीही पंतप्रधानांनी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या जोडप्याने सांभाळ केलेल्या 'रघू' या हत्तीसोबतही पंतप्रधानांचे फोटो आहेत. मोदींचे या भेटीतील आणि जंगल सफारीचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. त्यातील दोन फोटो शेअर करत काँग्रेस नेत्यानं प्रश्न विचारला आहे.
तमिळनाडूतील मृदुमलाई जंगलात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफारीचा आनंद घेतला. याच ठिकाणी थेप्पाकडू हा एलिफंट कॅम्प आहे. या कॅम्पमध्येच माहितीपटाचं शूट झालं आहे. इथे हत्तींचा सांभाळ आणि त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. सध्या इथे २८ हत्ती आहेत. याच ठिकाणी बोमन आणि बेली यांनी हत्तींचा सांभाळ केला आहे आणि त्यांचं हत्तींशी खास नातं जोडलं गेलं आहे. या जोडप्याला भेटून पंतप्रधानांनाही प्रचंड आनंद झाला. मोदींनी येथील जंगलात गेल्यानंतरही बोमन आणि बेली यांना भेटून नमस्कार केला होता. त्यावेळी मोदींच्या अंगावर कुर्ता आणि जॅकेट होते. मात्र, काही वेळानंतर मोदींचे दुसरे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये, मोदींनी जंगल सफारीसाठीचा ड्रेस परिधान केल्याचं दिसून येतंय.
मोदींच्या या कपडे बदलावरुन काँग्रेस नेत्याने ट्विट करुन दोन्ही फोटोतील फरक विचारला आहे. त्यावर, अनेकांनी काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांना प्रत्त्युत्तर दिलंय. त्यामध्ये, ही अतिशय सामान्य गोष्ट आहे, जंगलात जाण्यापूर्वी मोदींनी आपले कपडे बदलले आहेत, ती जंगल सफारीची पद्धत असते, असे उत्तर एकाने श्रीनिवास यांना दिलंय. तर, एकाने तुम्ही ट्विटरवरुन टीका करत बसा, ते तिकडे काँग्रेसचा मोठा पराभव करत आहेत, असेही एका ट्विटर युजर्सने उत्तर दिलंय.
दरम्यान, मोदींचा कुर्ता आणि जॅकेटमधील फोटो हा आगमनाचा तर जंगल सफारी ड्रेसमधील फोटो हा जंगल सफारी पूर्ण करुन तेथून रजा घेतानाचा आहे, असेही अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलंय.