नवी दिल्ली : अंदमान व निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून ‘श्री विजयपूरम’ असे ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी केंद्र सरकारने घोषित केला. पण, मुळात पोर्ट ब्लेअर हे नाव कसे पडले त्याचाही एक इतिहास आहे. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा नौदल अधिकारी कॅप्टन आर्चिबाल्ड ब्लेअर याच्या नावावरून शहराला ‘पोर्ट ब्लेअर’ हे नाव देण्यात आले होते.
ब्रिटिश वसाहतकालीन इतिहास सांगणाऱ्या एका वेबसाईटनुसार, कॅप्टन ब्लेअर १७७१ मध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीत रुजू झाला होता. त्याला पहिलीच जबाबदारी भारत, इराण आणि अरेबियाच्या किनारपट्टीच्या सर्वेक्षणाची मिळाली होती. १७८० मध्ये तो फ्रेंच युद्धनौकेच्या हाती लागला आणि १७८४ पर्यंत फ्रान्सच्या कैदेत राहिला. अटकेतून सुटल्यावर तो पुन्हा सर्वेक्षणाच्या कामास लागला. डिसेंबर १७८८ ते एप्रिल १७८९ या काळात त्याने अंदमान बेटांचे सर्वेक्षण केले. १२ जून १७८९ रोजी त्याने आपला सर्वेक्षण अहवाल कोलकात्याच्या ब्रिटिश गव्हर्नरला सादर केला. याच अहवालाच्या आधारे अंदमानवर वसाहत उभारण्याचा निर्णय ब्रिटिश साम्राज्याने घेतला.
वसाहती उभारण्याचे श्रेय ब्लेअर यांनाच
दक्षिण अंदमानात कॅप्टन ब्लेअर यास एक नैसर्गिक बंदर सापडले. त्यास त्याने बिटिश नौदलाचा तत्कालीन प्रमुख कोमोडोर विल्यम कॉर्नवॉलिस याच्या नावावरून पोर्ट कॉर्नवॉलिस असे नाव दिले. नंतर ब्रिटिश सरकारने कॅप्टन ब्लेअरच्याच नावावरून ‘पोर्ट ब्लेअर’ असे त्याचे नामांतर केले.
बेटांवर वसाहती उभारण्याचे श्रेय कॅप्टन ब्लेअर यालाच जाते. वसाहती उभारण्यासाठी बेटांचे सर्वेक्षणाचा जबाबदारी कॅप्टन ब्लेअर आणि लेफ्टनंट आरएच कोलेब्रुक यांच्यावर सोपविली होती. नंतर १७८९ मध्ये वसाहतीचा ऑफसर-इन-चार्ज म्हणून त्याची नेमणूक झाली. त्याच्या नेतृत्वाखाली बेटावरील जंगले हटवून बांधकामे करण्यात आली.