चंडीगड : क्रिकेटच्या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच संपलेली नसते. अशीच रोमांचक मॅच मंगळवारी हरयाणा विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली. भाजपने काँग्रेसच्या हातात असलेला विजयही असाच हिसकावून घेतल्याचे पाहायला मिळाले.
शहरी मतदार भाजपसोबत हरयाणाचे सायबरहब असलेल्या गुरुग्रामने भाजपच्या बाजूने मतदान केले. शहरी मतदारांनी भाजपवर निष्ठा कायम ठेवली. कर्नाटकमध्येही शहरी मतदार भाजपसोबत राहिले होते.
नायब सिंग सैनी फॅक्टर
भाजपने नायब सिंग सैनी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यामुळे ओबीसी समाज भाजपच्या मागे ठामपणे उभा राहिला. यादरम्यान काँग्रेस नेते विजयाच्या अतिआत्मविश्वासात मश्गुल राहिले. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरूनही पेच निर्माण झाला होता. सैनी यांनी मुख्यमंत्री होताच अनेक घोषणांची खैरात केली, त्याचाही सकारात्मक परिणाम मतदारांवर झाला.
जाट फॅक्टर ठरला महत्त्वाचा
- काँग्रेसला जाट मतांचा सर्वाधिक फायदा होईल असे म्हटले जात होते, उलट त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला. हरयाणात २५ टक्के जाट समाज असल्याचे म्हटले जाते.
- जाट बहुसंख्य असलेल्या ३६ जागांपैकी १९ जागांवर भाजपने आघाडी घेतली. त्यामुळे जाट समाजाने काँग्रेसच्या झोळीत कमी मते टाकल्याचे दिसते.
- लोकसभेला ३६ पैकी २७ जाटबहुल मतदारसंघांमध्ये काँग्रेसला विजय मिळाला होता. मात्र, ही मते कायम राखण्यात काँग्रेसला अपयश आले.
- जाट मतांना गृहीत न धरता भाजपने ओबीसींनी जवळ केलेले, त्याचा परिणाम निवडणुकीत पहायला मिळाला.