काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची दरवाढ करण्यात आली. ही दरवाढ यंदाच्या वर्षात झालेली चौथी आहे. यामुळे सिलिंडरचे दर दिल्लीत 1,053.00 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये आणि चेन्नईत 1068.50 रुपये एवढे झाले आहेत. ज्या महागाईच्या मुद्द्यावर, गॅस दरवाढ, इंधन दरवाढीवर मोदी सरकार काँग्रेस आघाडीला हरवून २०१४ मध्ये सत्तेत आले त्या सरकारला पाठिंबा देणाऱ्यांनी या गॅस दरवाढीवर मोठी नाराजी व्यक्त केली आहे.
एलपीजीच्या किंमतीत सारखी वाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढ आदीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अशा या ज्वलंत मुद्द्यावर सी- व्होटर- इंडिया ट्रॅकरने आयएएनएसकडून एक देशव्यापी सर्व्हे केला आहे. यामध्ये एनडीए म्हणजेच भाजपा आणि मित्रपक्षांच्या मतदारांचा तसेच काँग्रेस म्हणजेच युपीएच्या मतदारांचा कौल जाणून घेण्यात आला आहे.
एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीने या मतदारांनी मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याचे म्हटले आहे. तर केवळ ६ टक्के मतदारांनी आम्हाला काही फरक पडत नसल्याचे म्हटले आहे. दोन्ही बाजुच्या मतदारांचे मत मोदी सरकारला चिंतेत टाकणार आहे. कारण दोन्ही बाजुंनी प्रचंड नाखुशी व्यक्त करण्यात आली आहे. सर्व्हेवेळी एनडीएचे ९३ टक्के मतदारांनी आणि विरोधकांच्या ९४ टक्के मतदारांनी सरकारच्या या दरवाढीला विरोध केला आहे.
या सर्व्हेमध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही मतदारांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये ९५ टक्के शहरी आणि ९४ टक्क ग्रामीण मतदारांनी गॅस दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये सर्व जातीपातीचे लोक आहेत. या सर्वांनी अशा एका मुद्द्यावर एकमताने नाराजी जाहीर केली आहे.