अदानींच्या २० हजार कोटी रुपयांचं नेमकं प्रकरण काय? ज्यावरून राहुल गांधी नरेंद्र मोदींना करताहेत लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:52 PM2023-03-28T23:52:20+5:302023-03-28T23:53:33+5:30
Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही काळापासून उद्योगपती गौतम अदानींशी असलेल्या संबंधांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने लक्ष्य केले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही काळापासून उद्योगपती गौतम अदानींशी असलेल्या संबंधांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने लक्ष्य केले आहे. दरम्यान, गेल्या शनिवारी राहुल गांधी यांनी अदानींवर गंभीर आरोप केला होता. शेल कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटींची रक्कम ही अदानी ग्रुपमध्ये गुंतवण्यात आली, यामधील काही भारताच्या संरक्षण क्षेत्रातही कार्यरत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
राहुल गांधी यांनी हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्राशी जोडलं आहे. अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये अचानक २० हजार कोटी रुपये कुठून आले. हा पैसा कुणाचा होता, यामधील काही संरक्षण क्षेत्रातील कंपन्याही आहेत. संरक्षण मंत्रालय त्यावरून प्रश्न का विचारत नाही आहे, असा सवाल त्यांनी विचारला.
राहुल गांधी यांनी या प्रकरणामध्ये एका चिनी नागरिकाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले की, हा चिनी नागरिक कोण आहे, त्याबाबत प्रश्न का विचारले जात नाही आहेत, चीनच्या याच नागरिकाचा ऊल्लेख आधी हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. हा नागरिक तैवानमध्ये अदानी ग्रुपचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत त्यांना या शेल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची माहिती कुठे मिळाली, याबाबत काहीही सांगितले नाही. मात्र त्यांनी केलेले आरोप हे हल्लीच फायनान्शियल टाइम्समध्ये छापलेल्या एका रिपोर्टशी मिळते जुळते आहेत.
या आरोपांबाबतच्या पुराव्यांबाबत विचारले असता काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी राहुल गांधींनी जे आरोप केले आहेत. त्याचे पुरेसे पुरावे पक्षाकडे आहेत, असे सांगितले. जेव्हा सरकार या आरोपांची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी कऱण्यास तयार होईल, तेव्हा हे पुरावे या समितीसमोर सादर केले जातील, असे त्यांनी सांगितले.