कोलकाता - देशाच्या संसदेत घुसखोरी करण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या ललित झा या तरुणालाही दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे, दोन दिवसांपासून फरार असलेला लिलित झा हाही आता पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. ललितने त्याच्याकडी मोबाईल जाळून नष्ट केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, याप्रकरणी पोलीस अधिक गंभीर झाले आहेत. तर, दुसरीकडे भाजपाखासदाराने घुसखोरीचा मास्टरमाईंड ललितचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये, तो टीएमसी खासदार तापस रॉय यांच्यासोबत दिसून येतो.
संसदेतील घुसखोरीचा संपूर्ण कट रचणारा मास्टरमाइंड ललित झा याने दिल्ली पोलीस ठाण्यात सरेंडर केलं. संसदेच्या आत जाऊन निदर्शने करणाऱ्या चारही लोकांचे मोबाईल घेऊन ललित झा पळून गेला होता. तपासात देखील हेच समोर आलं आहे. मात्र, आता त्याच्या सरेंडरनंतर पोलिसांना ललित आणि महेशकडे एकही मोबाईल सापडला नाही. राजस्थानहून दिल्लीत येऊन सरेंडर करण्यापूर्वी ललितने तेथेच चारही मोबाईल नष्ट केले. दिल्लीतून पळून गेल्यानंतर ललित कुचामन येथे गेला होता, जिथे तो त्याचा मित्र महेशला भेटला. महेशनेच ललितला रात्री राहण्यासाठी एक खोली मिळवून दिली. ललितला अटक झाल्यानंतर आता ललितचे कोणाची कनेक्शन आहे का, त्याचा या घुसखोरीमागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास केला जात आहे.
संसदेत प्रवेश केलेल्या युवकांना म्हैसूरचे भाजपा खासदार प्रतापसिंह यांच्या पासवर प्रवेश मिळाला होता. त्यामुळे, त्यांच्यावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता, या घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा.. याचा फोटो तृणमूल काँग्रेसचे खासदार तापस रॉय यांच्यासोबत दिसून आला आहे. प. बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष डॉ. सुकांतो मजूमदार यांनी हा फोटो शेअर केला आहे. तसेच, आपल्या लोकशाहीच्या मंदिरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड ललित झा, गेल्या अनेक महिन्यांपासून टीएमसी खासदार तापस रॉय यांच्याशी घनिष्ठ संबध बाळगून आहे. याप्रकरणी खा.तापस रॉय यांची मिलिभगत असल्याचा हा पुरावा पुरेसा नाही का?, असा सवालही मजूमदार यांनी विचारला आहे.
भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनीही हा फोटो शेअर केला आहे. तसेच, याप्रकरणी सहभागी असलेल्या सर्वांचे संबंध आत्तापर्यंत काँग्रेस, समाजवादी पार्टी, आणि टीएमसी यांच्यासमवेत आढळून आले आहेत, असे मालविय यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आता संसदेतील घुसखोरीनंतर राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसून येतं आहे. विरोधक भाजपा खासदाराच्या चौकशी मागणी करत आहेत. तर, भाजपाकडून टीएमसी खासदारांच्या चौकशीची मागणी होत आहे.