दुर्ग : दुबईत बसलेल्या आरोपीशी तुमचा काय संबंध? काही तरी असेलच ना, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना केला. तर, भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांनी महादेवालाही सोडले नाही, अशी टीकाही केली. महादेव ॲप घोटाळ्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव समोर आल्यानंतर राजकारण तापले आहे. ईडी, सीबीआयला कुत्रा, मांजर असे संबोधणारे बघेल यांच्यावर मोदी यांनी शनिवारी दुर्ग येथील सभेत हल्लाबोल केला. भूपेश बघेल यांच्यावर थेट हल्ला केल्याची पहिलीच वेळ असून घोटाळे करणाऱ्यांना तुरुंगात पाठवणार, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
गरीब ही सर्वांत मोठी जात : माेदीपंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशात जर कोणती सर्वांत मोठी जात असेल तर ती गरीब आहे. प्रत्येक गरीब आज मोदींची महासेना बनला आहे. प्रत्येक गरिबाची सेवा करण्यासाठी त्यांनी गरीब कल्याणकारी कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यांच्या धोरणांमुळे देशातील गरिबी कमी होत आहे. आज गरीब एकजूट होत आहेत. हे पाहून इतर पक्षांची झोप उडाली आहे. आता गरिबांमध्ये फूट पाडण्याचा आणि गरिबांची एकता तोडण्याचा नवा खेळ सुरू झाला आहे. गरिबांची एकजूट तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडायचे आहे.