हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या वातावरणाचा पहिला सर्व्हे आला आहे. प्रॉपर्टी आयडी आणइ पोर्टल राज हे दोन प्रमुख मुद्दे लोकांना त्रस्त करत आहेत. यामुळे याचा फटका भाजपाला बसण्याची चिन्हे दिसत आहेत. ज्या लोकांनी ५०-६० वर्षांपूर्वी घरे बांधलेली त्यांच्याकडून लाखोंची घरपट्टी वसूल करण्यात आली. भरपूर लुटालुट करण्यात आली. ७० ते ८० टक्के मालमत्ता आयडी चुकीचे होते. नवीन घरे, दुकान घेणारेही त्रस्त झालेले आहेत. अशातच ही निवडणूक होत असल्याने काँग्रेसला त्याचा फायदा होताना दिसत आहे.
भाजपा पोर्टल प्रणाली भ्रष्टाचार संपविण्याचे मोठे शस्त्र असल्याचा प्रचार करत आहे तर काँग्रेस पोर्टल प्रणालीच संपविण्याचे आश्वासन देत आहे. मतदानाला आता १५ दिवस उरले आहेत. अशातच दैनिक भास्करने केलेला सर्व्हे समोर आला आहे.
राजकीय नेते, तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेनंतर हरियाणातील ९० जागांपैकी काँग्रेस ४० जागांवर विजय मिळविण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर भाजपाला १६ ते १८ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. जाट आणि दलितांची मते विभागली तर ही संख्या २३ वर जाऊ शकते. तर २३ जागा अशा आहेत जिथे कट टू कट फाईट होणार आहे. पुढील १०-१२ दिवसांत या जागांवरील मतदान कोणत्याही बाजुने फिरू शकते.
हरियाणामध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्येच खरी लढत आहे. आपने जरी फुशारक्या मारल्या तरी फारसा फरक पडणार नसल्याचे दिसत आहे. भाजप गेली १० वर्षे सत्तेत होती, यामुळे सत्ताविरोधी लाटही दिसत आहे. इनेलो, जेजेपी, आप हे काँग्रेसला मिळू शकणारी मते आपल्याकडे वळविणार आहेत. याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे. चौटालांच्या आघाडीला २-४ जागा मिळू शकतात. आप जरी सर्व जागा लढवत असली तरी एकाही मतदारसंघात पक्ष मजबूत नाहीय. परंतू इनेलो आणि आप काँग्रेसच्या काही जागा घालवू शकतात, अशी स्थिती आहे.
हरियाणामध्ये अपक्ष, बंडखोर हे देखील भाजपा आणि काँग्रेसचे गणित बिघडवू शकतात. दोन्ही पक्षांमध्ये ३०-३५ बंडखोर आहेत. जे तिकीट न मिळाल्याने नाराज असून अनेकांनी उमेदवारी दाखल केलेली आहे. या नेत्यांना समजाविण्याचे प्रयत्न दोन्ही बाजुंकडून केले जात आहेत.