नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत देशाच्या अण्वस्त्र संरक्षणाबाबत पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. संदर्भ होता ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या टीकेचा. ‘पाकची ताकद तपासण्यासाठी मी लाहोरला गेलो होतो,” असे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
‘भारताने पाकिस्तानशी संवाद साधावा आणि आपली लष्करी ताकद दाखविण्याचा प्रयत्न करू नये, कारण तसे केल्यास पाक आपली अण्वस्त्रे तैनात करील, आपण त्यांचा आदर केला पाहिजे,” असा इशारा मणिशंकर अय्यर यांनी दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “२०१५ मध्ये पाकिस्तानची किती ताकद आहे, हे मी लाहोरला जाऊन तपासून आलो आहे. आपण जेव्हा पाकिस्तानला गेलो तेव्हा अनेक पत्रकारांनी “हाय अल्ला तोबा, ये बिना विसा के आ गये’ (अरे देवा, हे व्हिसाशिवाय देशात आले कसे?) असा प्रश्न केला होता. मी त्यांना कधीतरी हा माझ्या देशाचाच भाग होता, याची आठवण करून दिली.”
दरम्यान, राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान उघडपणे सांगतात की, मी जैविक नाही, मला देवाने मोहिमेवर पाठवले. ज्यांना देवाने पाठवले, त्यांनीच कोरोनात लोकांना थाळी वाजवायला सांगितले.
मला देवानेच पाठवले...एका मुलाखतीत, मोदी यांना विचारण्यात आले की, ‘तुम्ही थकत का नाहीत?’ यावर मोदी म्हणाले, “मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे.”
मोदींच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. “माझ्या या विधानावर डाव्या विचारांचे लोक टीका करू शकतात. पण मी भारतातील १४० कोटी लोकांना देवाचे रूप मानतो, असे ते म्हणाले.
मी जिवंत असेपर्यंत... महेंद्रगड : “जोपर्यंत मी जिवंत आहेत, तोपर्यंत दलित आणि आदिवासींचे आरक्षण कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही,” अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी हरयाणातील महेंद्रगड येथील सभेत गुरुवारी दिली.
‘इंडिया’ आघाडी पुढील पाच वर्षांत पाच पंतप्रधानांबद्दल बोलत आहे. गाय दूध देण्यापूर्वीच त्यांच्या घटक पक्षांमध्ये तुपावरून भांडण सुरू झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. पंतप्रधानांची पंजाबमध्येही प्रचारसभा झाली.