Tirupati Balaji Temple Token System : तिरुपती : आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिराजवळ वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकन वितरण केंद्रांवर झालेल्या चेंगराचेंगरीत बुधवारी सहा जणांचा मृत्यू झाला. टोकन वितरण केंद्र सकाळी ५ वाजता उघडण्याचे नियोजित होते. यासाठी भाविक रांगा लावू लागले. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. विविध केंद्रांवर सुमारे ४,००० भाविक रांगेत उभे होते. चेंगराचेंगरीमुळे मोठा गोंधळ उडाला आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान, तिरुमला मंदिरात येणाऱ्या भाविकांची दीर्घ प्रतीक्षा सोपी आणि आनंददायी करण्यासाठी टोकन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. तिरुमलामध्ये लांब रांगा ही नेहमीच एक मोठी समस्या राहिली आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) तज्ज्ञ आणि वेळ व्यवस्थापन सल्लागारांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नवीन योजना लागू केली आहे. याअंतर्गत, कोणतीही व्यक्ती ५० रुपयांचे टोकन घेऊन दर्शन घेऊ शकते. मात्र, या टोकन अंतर्गत दर्शन घेण्यासाठी एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागतो. कधीकधी गर्दीमुळे दर्शन घेण्यासाठी २-३ तीन दिवसांचा वेळ लागतो.
५० रुपयांच्या टोकननंतर आणखी एक व्यवस्था आहे. जी व्हीआयपी श्रेणीमध्ये ठेवण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये, ३०० रुपयांचे व्हीआयपी टोकन खरेदी करावे लागते आणि या प्रणालीमध्ये जलद दर्शनाची शक्यता असते. ३०० रुपयांच्या प्रणाली अंतर्गतही आगाऊ बुकिंग करता येते. ज्यामुळे यात्रेकरूंना काही तासांत त्रासमुक्त दर्शन मिळण्याची शक्यता असते. तिकिटे ऑनलाइन सिस्टीम, पोस्ट ऑफिस आणि एपीटी ऑनलाइन सेंटर्सद्वारे बुक करता येतात.
मंदिर व्यवस्थापनाने दर्शनासाठी काही नियमही बनवले आहेत. याशिवाय, वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी विशेष दर्शनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. हे विशेष दर्शन अपंग आणि वृद्ध यात्रेकरूंसाठी (६५ वर्षांवरील) आहे, जे मंदिराजवळील स्वतंत्र प्रवेशद्वारातून दर्शन घेऊ शकतात. या श्रेणीतील यात्रेकरूंना दररोज दोन वेगवेगळ्या स्लॉटमध्ये प्रवेश दिला जातो. एक सकाळी १० वाजता आणि दुसरा दुपारी ३ वाजता. यासाठी १४०० टोकन दिले जात आहेत. शुक्रवार आणि बुधवारी, फक्त दुपारी ३ वाजताच्या स्लॉटसाठी १००० टोकन दिले जातात.