नवी दिल्ली - भारताने आज लो अर्थ ऑर्बिटमध्ये उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राचा वापर करून एक उपग्रह उद्ध्वस्त केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित दिली. भारतीय शास्त्रज्ञांच्या या कामगिरींमुळे भारत हा अंतराळात मारा करून उपग्रह उद्ध्वस्त करण्याची क्षमता बाळगणारा जगातील चौथा देश बनला आहे. दरम्यान भारताने ज्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये आज ही संपूर्ण मोहीम राबवली ते लो अर्थ ऑर्बिट म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या.लो अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीची सर्वात जवळ असलेली कक्षा होय. लो अर्थ ऑर्बिट भूपृष्ठापासून 160 किलोमीटर ते 2 हजार किलोमीटरपर्यंत स्थित असते. त्यानंतर मिडीयन अर्थ ऑर्बिट, Geosynchronous ऑर्बिट आणि हाय अर्थ ऑर्बिट अशा विविध कक्षा असतात. त्यापैकी हाय अर्थ ऑर्बिट हे पृथ्वीच्या पृष्टभागापासून 35 हजार 786 किमी अंतरावर स्थित आहे. सध्या भारताकडून अंतराळात मानव पाठवण्यासाठी मोहीम आखली जात आहे. 2022 मध्ये तीन अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याचे भारताने निश्चित केले असून, हे अंतराळवीर लो अर्थ ऑर्बिटमध्येच राहणार आहेत. या मोहिमेबाबत इस्रोने सांगितले की, केवळ 16 मिनिटांमध्ये तीन भारतीय अंतराळवीरांना श्रीहरीकोटा येथून अंतराळात पोहोचववले जाईल. हे भारतीय अंतराळवीर अंतराळात लो अर्थ ऑर्बिटमध्ये 6 ते 7 दिवस राहणार आहेत. हल्लीच काही उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवले गेले होते. जमिनीपासून अंतर कमी असल्याने येथून संदेशवहन चांगल्या पद्धतीने होत असते. तसेच काही उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेटच्या वेगात वाढ करण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. मात्र कुठलाही उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये टिकून राहणे खूप कठीण असते.
भारताने जिथे 'शक्ती' दाखवती ते लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 1:47 PM