नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पाकिस्तानला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही. पठाणकोटमध्ये वायुसेनेच्या कॅम्पवर आयएसआयला मोदींनीच हल्ला करुन दिला. पाकिस्तानचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दक्षिण गोवा येथे आपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला.
यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, निवडणुकीपूर्वी भारतामध्ये दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला. या घटना निवडणुकीपूर्वी घडवल्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या नक्की काय शिजतंय? हे काही समजत नाही. निवडणुकीपूर्वी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याबाबत केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काही दिवसांपूर्वी परदेशी पत्रकारांशी संवाद साधताना पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले होते की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली, तर भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्याची चांगली संधी मिळेल. इमरान खान यांच्या विधानाचा उल्लेख करत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शंका उपस्थित केली.
इतकचं नाही तर केजरीवाल असंही म्हणाले की, चार आठवड्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता इमरान खान नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून बघण्याची इच्छा व्यक्त करतात. ते असं का करत आहेत? आता लोकांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात प्रश्न विचारणे सुरु केले आहे. इमरान खान यांनी लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदर पुलवामा हल्ला का घडवून आणला? असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे.
तसेच पाकिस्तानला नरेंद्र मोदींशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही. पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या आयएसआयला चौकशीसाठी निमंत्रित केलं मात्र आयएसआय ही गुप्तचर यंत्रणेपेक्षा दहशतवाद्यांची यंत्रणा जास्त वाटते असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.