नवी दिल्ली - भारताचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता या पदासाठी योग्य उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. जनरल बिपिन रावत यांनी आपल्या एक वर्ष ३४१ दिवसांच्या कार्यकाळामध्ये या पदावर काम करताना आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. मुख्यत्वेकरून त्यांनी सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय आणि सैन्याच्या आधुनिकीकरणाचे काम ते उत्तम प्रकारे करत होते. आज आपण जाणून घेऊयात चिफ ऑफ डिफेन्स स्टाफचे काम काय असते? त्याची मुदत किती असते आणि त्यांना काय सुविधा आणि पगार दिला जातो, त्याविषयी.
चिफ ऑफ डिफेन्स स्टाफचा कार्यकाळ हा ३ वर्षे किंवा वयाच्या ६५ व्या वर्षांपर्यंत यापैकी जो आधी पूर्ण होईल, तोपर्यंत असतो. जनरल बिपिन रावत यांनी जेव्हा ही जबाबदारी सांभाळली तेव्हा हे पद पहिल्यांदाच निर्माण झाले होते. बिपिन रावत हे वयाच्या ६२ व्या वर्षी लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर देशाचे पहिले सीडीएस म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे भारतीय सैन्य दलामधील सर्वात मोठे पद आहे. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ हा ४ स्टार अधिकारी असतो. तो सैन्याच्या ज्या विभागाशी संबंधित असतो तोच गणवेश तो परिधान करतो. त्याच्या एंबलममध्ये सोन्याच्या धाग्यापासून अशोकचक्रासह सैन्याच्या तिन्ही दलांची प्रतीक चिन्हे तयार केलेली असतात. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या ऑफिसमध्ये एक अतिरिक्त सचिव आणि पाच संयुक्त सचिव आणि सपोर्ट स्टाफ असतो. त्यांच्यासोबत मिळून तो लष्कराच्या तिन्ही दलांसोबत मिळून काम करतो. तसेच अन्य भूमिकांसंबंधित काम करतो.
चिफ ऑफ डिफेन्स स्टाफचे मुख्य काम हे सैन्याच्या तिन्ही दलांच्या ऑपरेशन्समध्ये प्रभावी पद्धतीने काम करणे आणि सैन्याचे आधुनिकीकरण करणे हे आहे. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख संरक्षण सल्लागाराच्या भूमिकेमध्ये असतात. त्यांचे काम आणि जबाबदारी हीच असते. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफचे वेतन हे लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या बरोबरीचे म्हणजे २.५ लाख रुपये एवढे असते. तसेच त्यांना बंगल्यासह संबंधित सुविधा दिल्या जातात.
देशामध्ये चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद असावे, हा विचार अनेक वर्षांपासून सुरू होता. मात्र तो विचार वारंवार पुढे ढकलला जात होता. अखेरीच २०१९मध्ये मोदी सरकारने या पदाच्या निर्मितीवर शिक्कामोर्तब केले.