नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त करताना काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना त्यांच्याच शब्दांच उत्तर दिले. या काळात तिहेरी तलाकचे विधेयक लोकसभेत पुन्हा संमत करण्यात आले. मात्र, भाजपानेलोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला असून 1 जुलैला कोणत्याही परिस्थितीत संसदेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मला सुरूवात झाली आहे. राज्यसभेत पुरेसे संख्याबळ नसले तरीही लोकसभेत मोदींना स्पष्ट बहुमत आहे. यामुळे या जोरावर महत्वाचे निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. मोदींना गेल्या तीस वर्षांतील सर्वात जास्त बहुमत मिळाले आहे. 5 जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने खासदारांना व्हीप जारी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपाने तीन ओळींचा व्हीप जारी केला असून लोकसभेच्या खासदारांना 28 जून आणि 1 जुलैला सभागृहात कोणत्याही परिस्थितीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर राज्यसभेच्या सदस्यांना 1 जुलैला सभागृहात हजर राहण्यास सांगितले आहे. या काळात मोदी जी 20 देशांच्या शिखर परिषदेला हजर राहण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर असणार आहेत. यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत संसदेत कोणते निर्णय होतील, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.