नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने ‘ठुल्ला’ या शब्दाचा अर्थ काय, अशी विचारणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे. केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांबाबत हा शब्द वापरला होता. एका कॉन्स्टेबलने दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर सुनावणी करताना कनिष्ठ न्यायालयाने केजरीवालांना १४ जुलै रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यावर केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हे समन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांनी केजरीवालांच्या याचिकेवर सुनावणी करताना, २१ आॅगस्टपर्यंत त्यांना कनिष्ठ न्यायालयात व्यक्तिश: हजर राहण्यापासून सूट दिली. न्यायमूर्ती गुप्ता म्हणाल्या, ‘२१ आॅगस्टपर्यंत पेशीतून सूट आहे.’ तथापि, केजरीवाल यांना ‘ठुल्ला’ या शब्दाचा अर्थ या न्यायालयाला समजावून सांगावा लागेल. केजरीवाल यांनी वापरलेला शब्द हिंदी आहे. तथापि, तो शब्दकोशात नसल्याने कोर्टाला त्याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. मी हा शब्द कधीही ऐकलेला नाही. तुम्ही हा शब्द वापरला असेल तर निश्चितच त्याचा अर्थ तुम्हाला माहीत असेल, असे न्यायमूर्ती म्हणाल्या. न्यायमूर्तींनी केजरीवालांविरुद्ध खटला दाखल करणाऱ्या कॉन्स्टेबलला नोटीस पाठवून केजरीवाल यांच्या याचिकेबाबत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांची बाजू मांडताना वरिष्ठ विधीज्ञ एन. हरिहरन म्हणाले की, ठुल्ला शब्द सर्व पोलिसांसाठी नाहीतर गैरप्रकारात गुंतलेल्या पोलिसांसाठी वापरला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
केजरीवाल, ‘ठुल्ला’ म्हणजे नेमके काय?
By admin | Published: July 14, 2016 3:16 AM