जम्मू : ‘जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे आणि २०१९ मध्ये रद्द करण्यात आलेले कलम ३७० हे पूर्वीच्या राज्याच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा होता, आता तो दूर झाला आहे. जम्मू-काश्मीरचा असा विकास करू की, लोक स्वीत्झर्लंडला जाणे विसरून जातील,’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.
येथील जाहीर सभेत मोदी म्हणाले की, सरकार पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लोकांच्या दारापर्यंत पोहोचले आहे. ही मोदींची ‘गॅरंटी’ आहे आणि हीच कायम राहील. आम्ही जम्मू आणि काश्मीरचा विकास करण्याचा संकल्प केला आहे आणि मला विश्वास आहे की, येत्या काही वर्षांत तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करू. आम्ही अशा पायाभूत सुविधा निर्माण करू की, पर्यटक स्वीत्झर्लंडला जाणे विसरून जातील.
जम्मू आणि काश्मीरमध्ये ५० नवीन पदवी महाविद्यालये स्थापन करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली. जम्मू आणि काश्मीरमधील सुमारे १५०० नव्याने नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटपही केले.
३२,००० कोटींचे विकास प्रकल्प
मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये ३२००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या शिक्षण, रेल्वे, विमान वाहतूक आणि रस्ते क्षेत्रांसह अनेक विकास प्रकल्पांचा प्रारंभ केला.
पंतप्रधानांनी १३,५०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण किंवा पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये आयआयटी, आयआयएम आणि केंद्रीय विद्यापीठांचा समावेश आहे.
काँग्रेस विकास करू शकत नाही : गृहमंत्री
काँग्रेस भारताचा विकास करू शकत नाही. काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे. तो दिशाहीन पक्ष आहे. काँग्रेसने राममंदिराचा मुद्दा लटकत ठेवला,
- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री