नवी दिल्ली- आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा मसुदा प्रकाशित होताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करत या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. ममतांच्या या वक्तव्यांमुळे त्यांच्याविरोधात आसाममध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आसाममधील बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्याला विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी 13 वर्षांपूर्वी एकदम वेगळी भूमिका घेतली होती. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी घुसखोरांना विरोध केला होता. मात्र आता अचानक त्यांनी सरकारविरोधी भूमिका घेत घुसखोरांवर कारवाई चालणार नाही अशी वक्तव्ये सुरु केली आहेत.
ममता बॅनर्जी यांनी आसाममध्ये नागरिकत्व नोंदणीचा मसुदा स्थापन केल्यावर भारतात यादवी युद्ध पेटेल आणि रक्ताच्या अंघोळी घातल्या जातील असे टोकाचे विधानही केले आहे. त्यांनी अशाचप्रकारे नाट्यमय वर्तन 13 वर्षांपूर्वी केले होते. मात्र तेव्हा त्यांनी घुसखोरांना विरोध केला होता. त्यावेळेस लोकसभेच्या खासदार असणाऱ्या ममता यांना बंगालमध्ये बांगलादेशी नागरिकांनी घुसणे संकट वाटत होते आणि बांगलादेशींचे मतदार यादीत घुसणे त्यांना आपत्तीजनक वाटत होते.याबाबत ममता बॅनर्जी यांनी या "अत्यंत गंभीर मुद्द्यावर" चर्चा करण्यासाठी लोकसभेत प्रस्ताव मांडला होता. मात्र लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही. सोमनात चॅटर्जी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते आणि त्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे सरकार होते. यामुळेच त्यांनी आपला प्रस्ताव स्वीकारला नाही व पक्षपाती भूमिका घेतली असा आरोप करत ममता यांनी संतप्त व अत्यंत मोठ्या आवाजात लोकसभेत बोलायला सुरुवात केली. यावेळेस तालिका सभापती (अधिकारी) चरणजित सिंग अटवाल सभागृहाचे संचलन करत होते. संतप्त ममतांनी अत्यंत आक्रस्ताळी भूमिका घेत अटवाल यांच्या दिशेने कागद भिरकावून तितक्याच मोठ्या आवाजात आरोप करत सभागृह सोडले होते आणि आपल्या पदाचा राजीनामाही दिला. ममतांच्या नाट्यमय भूमिकेने संपूर्ण सभागृह हादरुन गेले होते.
मात्र योग्य मसुद्यामध्ये राजीनामा नसल्याने सोमनाथ चॅटर्जी यांनी तो स्वीकारला नव्हता. आज ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेत आमूलाग्र बदल झालेला आहे. आसामपाठोपाठ पश्चिम बंगालमधील घुसखोरांचा मुद्दा ऐरणीवर येईल तसेच रोहिंग्यांच्या बाबतीतही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याआधीच ममता यांनी आपल्या मूळ भूमिकेवर यू टर्न घेत एकापाठोपाठ एक वक्तव्ये करायला सुरुवात केली आहे.