ऑनलाइन लोकमत
बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आयुष्यात ताण-तणाव वाढले आहेत. प्रत्येक टप्प्यावर कराव्या लागणा-या स्पर्धेमुळे टेंशन आयुष्याचा एक भागच बनून गेले आहे. शिफ्टमध्ये करावी लागणारी डयुटी, कामाचा वाढलेला लोड आणि घरच्या समस्यांमुळे चिंता, तणाव, माणसाचा सतत पाठलाग करत असतात.
या सर्व परिस्थितीत शरीर आणि मनाला तंदुरुस्त आणि ऊर्जावान ठेवण्याचा मार्ग म्हणजे 'योगा'. सध्याच्या जीवनशैलीत मन आणि शरीराच्या योग्य संतुलनासाठी 'योग शिक्षण' काळाची गरज बनले आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्ती आपल्या व्यस्त दिनक्रमात योगासाठी खास वेळ राखून ठेवतात.
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असून, योगा ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य भेट आहे. योगाला हजारो वर्षांचा इतिहास असून, योग भारताच्या प्राचीन पंरपरेचा भाग आहे. आज भारतातच नव्हे तर, अमेरिकेसह जगातील अनेक प्रमुख देशात योगासने करणा-यांची संख्या वाढत आहे. योगाची सुरुवात भारतातून झाली असली तरी, जगातील अनेक देश योगासनातून अधिकाधिक लाभ मिळावेत यासाठी त्यावर संशोधन करत आहेत.
भारतामुळे आंतरराष्ट्रीय योगदिनाची सुरुवात
आंतरराष्ट्रीय योगदिनाचे संपूर्ण श्रेय भारताला जाते. भारताच्या प्रयत्नांमुळे आंतरराष्ट्रीय योगदिनाची सुरुवात झाली. २७ सप्टेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रातील आपल्या पहिल्याच भाषणात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. योगासने फक्त व्यायाम प्रकार नसून स्वत:ला शोधण्याचा तो एक मार्ग आहे असे मोदी त्यावेळी म्हणाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योगदिनाचा फक्त प्रस्ताव मांडूनच थांबले नाहीत तर, त्यानंतर भारत सरकारने या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी पाठपुरावा केला. १४ ऑक्टोंबर २०१४ रोजी भारताच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्रामध्ये औपचारीक चर्चा झाली. त्यानंतर ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केला. २१ जून उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असून, जगात अनेकांसाठी हा दिवस महत्वाचा असल्याने मोदींनी २१ जूनचा प्रस्ताव दिला होता.
११ डिसेंबर २०१४ रोजी भारताचे संयुक्त राष्ट्रातील कायमस्वरुपी प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी योगदिनाचा प्रस्ताव मांडला. ज्या प्रस्तावाला तब्बल १७७ सदस्य देशांनी समर्थन दिले. २०१५ पासून योगदिनाची सुरुवात झाली. भारतात मोठया प्रमाणावर हा दिवस साजरा केला जातो. आता अन्य देशही मोठया प्रमाणावर हा दिवस साजरा करु लागले आहेत.