नवी दिल्ली : केंद्र सरकारने विशेष दर्जा देणारे जम्मू-काश्मीरमधीलकलम 370 रद्द केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रेंसचे नेता ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. नजरकैदेत असलेल्या ओमर अब्दुल्ला यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर विश्वासही वाटणार नाही, की ते ओमर अब्दुल्ला आहेत.
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या फोटोत ओमर अब्दुल्ला यांनी आकाशी रंगाचा शर्ट परिधान केल्याचे दिसून येते. तसेच, दाढी वाढविली आहे. याआधी अशा लूकमध्ये ते कधीच दिसले नव्हते. त्यामुळे त्यांचा असे रूप पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, अद्याप हे स्पष्ट झाले नाही आहे की, ओमर अब्दुल्ला यांचा हा फोटो कधी काढण्यात आला आहे. मात्र, असे सांगण्यात येत आहे की नॅशनल कॉन्फ्रेंसच्या एका नेत्याने ओमर आब्दुल्ला यांचा फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधीलकलम 370 रद्द केल्यानंतर याठिकाणी निर्बंध लागू करत ओमर अब्दुल्ला यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. ओमर अब्दुल्ला स्टेट गेस्ट हाउसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, काल कलम 370 रद्द केल्याप्रकरणी केंद्र सरकारविरोधात आंदोलन केल्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची बहीण सुरय्या आणि मुलगी साफिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. 14 ऑक्टोबरपासून काश्मीर खोऱ्यातील सर्व पोस्टपेड मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीर प्रशासनाने याची घोषणा केली आहे. गेल्या 69 दिवसांपासून खोऱ्यातील मोबाईल फोन सेवा बंद करण्यात आलेली आहे.