मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली आणि एनसीआर परिसरात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर येथे फटाक्यांची विक्री आणि साठ्यावर बंदी आणली असून, आपला नोव्हेंबर 2016 मधील आदेश कायम ठेवत हा निर्णय सुनावला आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. चेतन भगत यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. फटाक्यांविना मुलांसाठी दिवाळीचा अर्थ काय ? असा प्रश्न चेतन भगत यांनी विचारला आहे. चेतन भगत यांनी एकामागोमाग एक सलग ट्विट करत आपली नाराजी जाहीर केली आहे.
'सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके वाजवण्यावर बंदी आणली आहे ? पुर्णपणे बंदी ? लहान मुलांसाठी फटाक्यांविना काय दिवाळी ?' असं चेतन भगत यांनी पहिल्या ट्विटमध्ये विचारलं आहे. चेतन भगत यांनी पुढे लिहिलं आहे की, 'फटाकेबंदीवर मी विचारु शकतो का...हे करण्याची हिंमत फक्त हिंदूंच्या सणावेळीच का ? बक-यांचा बळी देण्यावर आणि मुहर्रममध्ये रक्त वाहण्यावरही बंदी येतीये का ?'.
चेतन भगत यांनी पुढे लिहिलं आहे की, 'दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणणे म्हणजे ख्रिस्मसला ख्रिस्मस ट्रीवर, आणि बकरी ईदला बक-यांवर बंदी आणण्यासारखं आहे. परंपरांचा आदर करा'. 'आज आपल्याच देशात त्यांनी लहान मुलांच्या हातातून फुलबाजा हिसकावून घेतला आहे. दिवाळीच्या शुभेच्छा माझ्या मित्रा', असं त्यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पुढे त्यांनी लिहिलं आहे की, 'जे लोक दिवाळी फटाक्यांवर बंदी यावी म्हणून प्रयत्न करत आहेत, त्यांचा हाच उत्साह हत्या आणि हिंसा असणा-या दुस-या सणांच्यावेळी देखील पाहू इच्छितो'.
सर्वोच्च न्यायालयाने यंदाच्या दिवाळीत दिल्ली आणि नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर) भागात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. येत्या 18 ऑक्टोंबरपासून दिवाळी सुरु होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2016 सालचा फटाके विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पुन्हा लागू करावा यासाठी याचिका दाखल झाली होती. ए.के.सिकरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 6 ऑक्टोंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने मागच्यावर्षी 11 नोव्हेंबरला एनसीआर भागात फटाकेविक्रीचे सर्व परवाने निलंबित केले होते.
यावर्षी 12 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने या बंदी संदर्भात नियम थोडे शिथिल केले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाकेविक्रीवर बंदी घालण्याला आपले समर्थन असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. दिवाळी आणि त्यानंतरच्या दिवसात हवाई प्रदूषणामध्ये मोठी वाढ होते. या मोसमात प्रदूषणात वाढ होण्यामागे विविध कारणे आहेत त्यात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हे सुद्धा एक कारण आहे असा युक्तीवाद वकील गोपाळ शंकरनारायण यांनी केला. ते अर्जुन गोपाळ यांच्यावतीने युक्तीवाद करत होते. दिल्ली पोलिसांनी दुकानदारांना जारी केलेले फटाकेविक्रीचे परवानेही सर्वोच्च न्यायालयाने निलंबित केले.