नवी दिल्ली : आजपासून कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. सोमवारी सकाळी नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. एम्समधील नर्स पी. निवेडा यांनी नरेंद्र मोदींना कोरोनाची लस दिली. (What PM Narendra Modi told AIIMS nurse Sister P Niveda after receiving Covid vaccine)
पी. निवेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लस टोचल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "सरांना (नरेंद्र मोदी) भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला गेला आहे, तर दुसरा डोस 28 दिवसांत देण्यात येईल." याचबरोबर, नरेंद्र मोदींनी तुम्ही मुळच्या कुठून आहात असे विचराले. तसेच कोरोनाची लस दिल्यानंतर त्यांनी म्हटले की, लस दिली सुद्धा, कळलंही नाही, (लगा भी दिये, पता भी नही चला) अशी प्रतिक्रिया पी. निवेडा यांनी दिली.
कोरोनाची लस घेतल्यानंतर मोदींचे जनतेला आवाहननरेंद्र मोदी यांनी लस घेतल्यानंतर देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, "एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केले, ते कौतुकास्पद आहे." तसेच, लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना आवाहन करत भारत कोरोनामुक्त बनवूयात, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात देशात आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. तसेच 45 वर्षे पूर्ण ते 60 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या टप्प्यामध्ये केले जाणार आहे.
कोणाला लस मिळणार, किती रुपये द्यावे लागणार?कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा राबविला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या टप्प्यात 27 कोटी नागरिकांचे लसीकरण केले जाईल. जवळापास 12 हजार सरकारी रुग्णालयात कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच खासगी दवाखान्यात ही लस घ्यायची असेल तर, एका लसीसाठी 250 रुपये द्यावे लागतील.
तुमच्या सोयीनुसार लस घेता येणारसीरम इन्टिट्यूचची कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोनच लसी भारतात उपलब्ध आहेत. लसीकरणावेळी जी लस उपलब्ध असेल ती लस घ्यावी लागेल. आपल्या सोयीनुसार लस घेण्याची सुविधा सध्यातरी नाही. तसेच, लस घेण्यासाठीची वेळ आणि ठिकाण म्हटलं तर ते निवडण्याचा पर्याय लसीकरणाची नोंदणी करतानाच उपलब्ध करुन देण्यात आला आहे.