नवी दिल्ली - अयोध्येत उद्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष उपस्थिती असणार आहे. दरम्यान, या सोहळ्याला काही तास उरले असताना सरकारकडून राम मंदिराच्या प्रस्तावित वास्तूची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चाळीस किलो वजनाची चांदीची विट कोनशिला म्हणून स्थापित करण्यात येणार आहे. दरम्यान, राम मंदिराच्या पायाभरणी सोहळ्यासाठीच्या धार्मिक अनुष्ठानास सोमवारपासून सुरुवात झाली आहे.
या सोहळ्याबाबत अधिक माहिती देताना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी 175 प्रतिष्ठित अतिथींना निमंत्रित करण्यात आले आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी विविध अध्यात्मिक परंपरा असलेल्या १३५ संतांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर भूमिपूजनावेळी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अन्य पाच मान्यवर उपस्थित असतील.
राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात सजले आहे. परिसर सुशोभित करण्यात आला असून संपूर्ण अयोध्या नगरी विद्युत दिव्यांच्या रोषणाईने झळाळून उठली आहे. जागोजागी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमा असलेले फलक लावण्यात आले आहेत. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 5 ऑगस्ट रोजी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे.
कोरोनाच्या सावटाखाली होत असलेला हा भूमिपूजन सोहळा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. नरेंद्र मोदी राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर देशाला संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे.