बेळगावात आज सकाळपासूनच मतदानासाठी उत्साह दिसून येत आहे. सकाळी मतदान सुरु होताच मतदानाला रांगा लागल्या आहेत. बेळगावकर मराठी माणसे तशी मराठीच्या मुद्द्यावर जागरुक असतातच. मात्सर आजच्या रांगांचे कारण वेगळे आहे. बेळगावात दुपारी पावसाची शक्यता असल्याने उगाच त्रास नको म्हणून मतदारांनी मतदानकेंद्रांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे सकाळपासून बेळगावं शहरासह उपनगरात देखील रांगा वाढल्या आहेत.बेळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 18 जागा आहेत. या १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये 37 लाख 37 हजार मतदार आहेत. त्यापैकी महिला 18 लाख 34 हजार तर पुरुष 18 लाख 88 हजार मतदार आहेत.4416 मतदान केंद्र आहेत त्यातील 836 अति संवेदनशील आहेत. या 18 मतदार संघात 203 उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी 184 पुरुष तर 19 महिला आहेत. 24288 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बेळगाव ग्रामीण मधून एकीकरण समितीचे मनोहर किणेकर, काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर, भाजपचे संजय पाटील, बेळगावं दक्षिण समितीचे किरण सायनाक, भाजपचे अभय पाटील,कॉंग्रेसचे एम डी लक्ष्मी नारायण, मध्यवर्ती समितीचे प्रकाश मरगाळे तर खानापुरातून समितीचे विलास बेळगावकर, काँग्रेसच्या अंजलीताई निंबाळकर, जे डी एस चे नासिर बागवान,भाजपचे विठ्ठल हलगेकर,मध्यवर्ती समितीचे अरविंद पाटील ,बेळगावं उत्तरेतून कॉंग्रेसचे फिरोज सेठ, भाजपचे अनिल बेनके, समितीचे बाळासाहेब काकतकर रिंगणात आहेत. एकीकरण समितीतर्फे दोन दोन उमेदवार उभे राहिले आहेत. सीमाभागातील चार विधानसभा मतदारसंघ मराठींसाठी महत्वाचे मानले जातात. बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण, खानापूर. मात्र शक्य असूनही चारपैकी दोनच मतदारसंघात संभाजी पाटील आणि अरविंद पाटील हीच समितीची दोन मराठी माणसे आमदार म्हणून निवडून आली. आज या सर्वांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
समिती एक, उमेदवार दोन
मतदारसंघ | शहर समिती | मध्यवर्ती समिती |
बेळगाव दक्षिण | किरण सायनाक | प्रकाश मरगाळे |
बेळगाव उत्तर | बाळासाहेब काकतकर | संभाजी पाटील |
बेळगाव ग्रामीण | मोहन बेळगुंदकर | मनोहर किणेकर |
खानापूर | विलास बेळगावकर | अरविंद पाटील |