आज १२४ वी आंबेडकर जयंती : काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप आमने-सामनेशीलेश शर्मा - नवी दिल्लीसरदार पटेल यांच्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून काँग्रेस आणि भाजप समोरासमोर उभे ठाकले आहेत. डॉ. आंबेडकर यांची १२४ वी जयंती संपूर्ण वर्षभर साजरी करणार, असे काँग्रेसने जाहीर केल्याबरोबर भाजपनेही डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्याचा आपला कार्यक्रम घोषित केला. त्यामुळे सरदार पटेलांवर हक्क कुणाचा यावरून काँग्रेस-भाजपत सुरू झालेल्या लढाईच्या धर्तीवर आता डॉ. आंबेडकर कुणाचे, यावरून लढाई सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी सोमवारी काँग्रेसच्या डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव कमिटीची एक बैठक घेण्यात आली. डॉ. आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम महू येथे प्रारंभ करून त्याचा नागपूर येथे समारोप करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मेच्या अखेरीस महू येथे राष्ट्रीय स्तरावर डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमाचा शुभारंभ केला जाईल. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे या कार्यक्रमाला हजर राहतील. त्यासोबतच सर्व राज्यांमध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातील.मंगळवारी डॉ. आंबेडकर यांची जयंती आहे. या दिवशी केवळ सांकेतिक कार्यक्रम घेण्यात येतील. त्यासाठी आयोजन कमिटीचे उपाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे हे महू येथे जाणार आहेत.बाबासाहेबांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरविणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, असा दावा या बैठकीनंतर शिंदे, मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँथोनी आणि के. राजू यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यातून डॉ. आंबेडकरांचा वारसा काबीज करण्याच्या शर्यतीत भाजपला मागे टाकण्याची पूर्ण तयारी काँग्रेसने केल्याचे संकेत मिळाले.१४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६ पर्यंत चालणाऱ्या आंबेडकर जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमावर काँग्रेसच्या या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. काँग्रेसने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दलितांच्या सक्षमीकरणासाठी तयार केलेला जाहीरनामा हा या जयंती महोत्सवाचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून काम करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या जयंती महोत्सवाअंतर्गत महू, मुंबई आणि नागपूर येथे राष्ट्रीय स्तरावरचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. मुंबईत चिंतन बैठक घेण्यात येईल आणि दलितांविरुद्धचा भेदाभेद नष्ट करण्याबाबत त्यात चर्चा केली जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष के. राजू यांनी दिली.