पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बांगलादेश मुद्द्यावर मोठी चर्चा झाली. बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेची भूमिका ट्रम्प यांनी स्पष्टपणे नाकारल्याचे वृत्त आहे. तसेच, देशाबाबतचा निर्णयही पंतप्रधान मोदींवर सोपवण्यात आला आहे. भारतीय पंतप्रधानांनी बांगलादेशातील परिस्थितीवर राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांच्याशीही चर्चा केली आहे.
वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिकेतील व्यापार आणि संबंधांवर चर्चा केली. ट्रम्प असेही म्हणाले की, 'मी बांगलादेशचा मुद्दा पंतप्रधान मोदींवर सोडतो.'
गेल्या वर्षी बांगलादेशातील विद्यार्थी चळवळीदरम्यान झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर शेख हसीना यांचे सरकार कोसळले. त्यांना स्वतःला देश सोडून पळून जावे लागले. यानंतर, नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे प्रमुख बनवण्यात आले. विशेष म्हणजे एकीकडे युनूस हे अमेरिकन नेत्या हिलरी क्लिंटन यांच्या जवळचे मानले जातात. तर ट्रम्प आणि त्यांचे मतभेद असल्याचे बोलले जात आहे. ट्रम्प पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा युनूस यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
पंतप्रधान मोदींच्या गॅबार्ड यांच्याशी झालेल्या भेटीबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, 'चर्चेचे मुद्दे द्विपक्षीय गुप्तचर सहकार्य वाढवणे, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख धोके आणि धोरणात्मक गुप्तचर माहितीची देवाणघेवाण हे होते.' बांगलादेशातील परिस्थितीबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे भारताच्या शेजारील देशातील सध्याच्या परिस्थितीचा भारताच्या सुरक्षेवर आणि प्रादेशिक स्थिरतेवरही मोठा परिणाम होत आहे.
हिंदूवरील अत्याचारावर आवाज उठवला
गॅबार्ड यांनी अनेक वेळा पाकिस्तान आणि बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला आहे. २०२१ मध्ये त्यांनी बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी अमेरिकन काँग्रेसमध्ये एक प्रस्ताव मांडला. त्यांनी प्रस्तावात नमूद केले होते की, ५० वर्षांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशात हजारो बंगाली हिंदूंवर अत्याचार करून त्यांची हत्या केली होती.
गॅबार्ड यांच्या आईने हिंदू धर्म स्वीकारला होता. त्यांनी सर्व मुलांना हिंदू नावेही दिली. त्यांनी हातात भगवद्गीता घेऊन पदाची शपथ घेतली. यापूर्वी, त्यांनी २०१९ मध्ये न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यांनी २०२२ मध्ये डेमोक्रॅटिक पक्ष सोडला आणि रिपब्लिकनमध्ये सामील झाल्या.