नवी दिल्ली : काही लोकांमध्ये किती नकारात्मकता आहे, काही लोकांना नकारात्मक राजकारणाने कसं घेरलंय हे आज समजलं, त्यांचा चेहरा आज सर्वांच्या समोर आला अशा शब्दांमध्ये काँग्रेस खासदारांचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. चर्चेची तयारी नव्हती तर अविश्वास दर्शक ठराव मांडलाच कशाला, ही चर्चा टाळण्याचा प्रयत्न विरोधक का करत होते? राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या जागेवर जाऊन मिठी मारण्याच्या घटनेचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ही आपल्या सरकारची परिक्षा नाही तर काँग्रेसच्या तथाकथित मित्रपक्षांची आहे. 2019 साली सरकार आल्यावर केवळ मी पंतप्रधान होणार असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. हे नेते आपल्या साथीदार पक्षांच्या भावना जाणून घेण्यासाठी आजच्या अविश्वास ठरावाची मदत घेत आहेत.
आज दुपारी केवळ चर्चा सुरु होती, तेव्हा कोणताही निर्णय झाला नव्हता त्याआधीच पंतप्रधानांच्या जागेवर येऊन उठा उठा असे म्हणण्याची घाई काही लोकांना लागली आहे. या जागेवर कोणीही बसवत नाही किंवा कोणी उठवूही शकत नाही. फक्त सव्वाशे कोटी लोकच तुम्हाला या जागेवर बसवू शकतात. पंतप्रधानपदाची घाई कसली झाली आहे अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांना मोदी यांनी प्रश्न विचारुन काँग्रेसला निरुत्तर केले. केवळ मीच पंतप्रधान बनणार या भावनेला बळकट करण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्न करत आहेत असे सांगत आपल्या एकेक योजनेची माहिती व त्यामुळे देशाला झालेला फायदा याची यादी त्यांनी वाचून दाखवली. मेक इन इंडिया, आर्थिक व्यवहारांचे डिजिटायजेशन, काळ्या पैशाविरोधात सरकारचे प्रयत्न,
अविश्वासदर्शक ठरावाच्या विरोधकांच्या हेतूबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, केवळ नरेंद्र मोदी यांना बाजूला करण्याच्या एकमेव भावनेने विरोधक एकत्र येत आहेत. आम्ही या पदावर आहोत कारण सव्वाशे कोटी लोकांचे आम्हाला आशीर्वाद मिळालेले आहेत. सबका साथ सबका विकास या घोषणेबरोबर आमचं सरकार काम करत आलं आहे. याबरोबर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सरकारची विविध कामांची जंत्रीच वाचून दाखवली. आपले सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी कटिबद्ध आहे असेही त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. प्रधानमंत्री फसलविमा योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला आहे.
भाषणाच्या सुरुवातीस पंतप्रधान मोदी यांनी , ''ज्या पद्धतीने आपण सभागृहाचं संचलन केलं याबद्दल मी आपला आभारी आहे'' अशा शब्दात सभापती सुमित्रा महाजन यांचे आभार मानले. तसेच अविश्वास ठरावाचा विरोध करण्याचं सर्व सभागृहाला आवाहन केले. पंतप्रधानांच्या भाषणात टीडीपी खासदारांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तसेच घोषणाबाजीही सुरु केली. या घोषणांमध्येच पंतप्रधानांनी भाषण सुरु ठेवले.