Corona Vaccination: कोरोना विषाणू विरोधात केंद्र सरकारची देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. जानेवारी महिन्यापासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली. यात भारतात लसीकरणाच्या वेगावरुन वेगवेगळीत मतमतांतरं आणि टीका देखील केली जात आहे. अशातच सरकारनं लसीकरणाच्या आकेडवारीचा एक अहवालच आज जारी केला आहे.
कोरोना लसीकरणाचं जुलै महिन्याचं निर्धारित लक्ष्य गाठण्यापासून २.८२ कोटी डोस पिछाडीवर राहिल्याची माहिती समोर आली आहे. जुलैच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारनं ५१.६ कोटी लसीचे डोस पुरविण्याचं लक्ष्य ठेवल्याचं कोर्टासमोर म्हटलं होतं. पण ते पूर्ण होऊ शकलेलं नाही.
केंद्र सरकारनं ३१ जुलैपर्यंत निश्चित केलेलं कोरोना लसीकरणाचं लक्ष्य ९४.५ टक्के पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पण या आकडेवारीपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रानं पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचेही आभार व्यक्त केले आहेत. सीरम इन्स्टिट्यूटकडून जुलै महिन्यात मिळणाऱ्या संभाव्य लसीच्या डोसपेक्षाही अधिक डोस केंद्र सरकारला मिळाल्यानं जुलै महिन्यातील लसीकरणाचं लक्ष्य ९४.५ टक्क्यांपर्यंत पूर्ण होऊ शकलं आहे, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून देशात सध्या कोव्हिशील्ड लसीचं उत्पादन केलं जात आहे.
कोव्हिशील्डचे ३८ कोटी डोस उपलब्ध होण्याचा अंदाजजुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कोव्हिशील्ड लसीचे ३८.६ कोटी डोस उपलब्ध होणं अपेक्षित होतं. पण आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार २५ जुलैपर्यंत सीरम इन्स्टिट्यूटकडून केंद्र सरकारला ३९.११ कोटींहून अधिक डोस उपलब्ध झाल्याची माहिती संसदेत देण्यात आली आहे.
दरम्यान, भारत बायोटेककडून कोव्हॅक्सीनच्या अपेक्षित पुरवठा होऊ शकलेला नसल्याचंही समोर आलं आहे. केंद्रानं सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ३१ जुलैपर्यंत कोव्हॅक्सीनचे ११ कोटी डोस उपलब्ध होणं अपेक्षित होतं. पण सरकारनं संसदेत दिलेल्या माहितीनुसार भारत बायोटेककडून आतापर्यंत फक्त ५.७९ कोटी डोस उपलब्ध झालेले आहेत.