केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाचं काम सध्या वेगानं सुरू आहे. आज खुद्द गडकरींनी मध्य प्रदेशातल्या रतलाममध्ये रस्त्याचं परीक्षण केलं. गडकरींनी एका कारमधून रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांची कार १७० प्रतिकिमी वेगांनं धावत होती. गडकरींनी द्रुतगती महामार्गाच्या घेतलेल्या चाचणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी गडकरींनी हेलिकॉप्टरमधून द्रुतगती मार्गाचा आढावा घेतला होता. मात्र आता त्यांनी कारमधून रस्त्याच्या कामाची पाहणी केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाच्या कामाचा आढावा घेतला. त्यासाठी ते रतलामला गेले. रतलामच्या जावरामधून द्रुतगती मार्ग जात आहे. द्रुतगती मार्गाची गुणवत्ता आणि कामाची गती पाहण्यासाठी गडकरींनी हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. त्यानंतर कारच्या माध्यमातून त्यांनी द्रुतगती मार्गाच्या कामाचा आढावा घेतला. 'गुणवत्ता चांगली असायला हवी असं आम्ही आधीच रस्त्याची निर्मिती करणाऱ्या कंपनीला सांगितलं होतं. आज केलेली चाचणी योग्य होती. या मार्गावर वाहनं १२० किमी प्रतितास वेगानं धावू शकतील,' असं गडकरी म्हणाले.
गडकरींनी जवळपास पाऊण तास रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत खासदार गुमानसिंह डामोर, अनिल फिरोजिया आणि सुधीर गुप्ता, रतलामचे आमदार चैतन्य कश्यप, डॉ. राजेंद्र पांडे उपस्थित होते. मध्य प्रदेशच्या तीन जिल्ह्यांमधून द्रुतगती मार्ग जाणार आहे. रतलाम, मंदसौर आणि झाबुआमधून द्रुतगती मार्ग जाईल. नोव्हेंबर २०२२ पर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात ८ लेन असतील. त्यानंतर ४ लेनचं काम पूर्ण करण्यात येईल.