नवी दिल्ली: आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी करण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली. ईव्हीएमची चीप अमेरिकेतून येते. त्यामुळे ती मशीन हॅक करण्यात परकीय शक्तींचा हात असू शकतो, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, अशी मागणीदेखील त्यांनी केली. मात्र निवडणूक आयोगाकडून कोणतीही अपेक्षा नसल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकारांशी संवाद साधताना राज यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ईव्हीएमचा धागा पकडत मॅच फिक्स असेल, तर नेट प्रॅक्टिसचा उपयोगच काय, असा बाऊन्सर राज यांनी टाकला. गेल्या 20 वर्षांपासून ईव्हीएमवर शंका घेतली जात आहे. 2014च्या आधी भाजपानंदेखील ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला होता. मात्र 2014 नंतर त्यांचा सूर बदलला, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. केवळ औपचारिकता म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं राज यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं ठरेल. निवडणूक आयोगाला भेटलात का?, असं तुम्ही विचाराल म्हणून त्यांची (आयोगाची) भेट घेतल्याचं राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले. महाराष्ट्रात गेल्यावर ईव्हीएमबद्दलची भूमिका ठरवू, असं राज यांनी सांगितलं. गेल्या ऑगस्ट महिन्यात सर्व राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना यासाठी पत्र पाठवलं होतं. मात्र त्यावेळी कोणीही ऐकलं नाही. पण आता नक्की विचार करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
...तर नेट प्रॅक्टिसचा उपयोगच काय?; विधानसभेच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा 'बाऊन्सर'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 2:06 PM