Kangana Ranaut farm laws remark : खासदार कंगना रणौत यांच्या विधानामुळे भाजपाची पुन्हा एकदा अडचण झाली. कंगना रणौत यांनी रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे पुन्हा लागू करण्यात यावे, अशी मागणी केली. हरियाणात विधानसभेची निवडणूक होत असताना कंगना रणौत यांनी हे वक्तव्य केले, त्यापासून भाजपाने स्वतःला दूर केले आहे. कंगना रणौत यांची ती वैयक्तिक भूमिका असून, त्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी अधिकृत नाहीत, असेही पक्षाने म्हटले आहे.
हरियाणामध्ये विधानसभेची निवडणूक होत असताना दुसऱ्यांदा कंगना रणौत यांच्या विधानामुळे भाजपाची अडचण झाली आहे. यापूर्वी कंगना रणौत यांनी शेतकरी आंदोलनावर टीका केली होती. आंदोलनात बलात्कार आणि लोकांना मारून लटकावण्यात आले, असे विधान खासदार कंगना रणौत यांनी केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी भाजपाला अडचणीचे ठरेल असे विधान केले आहे.
तीन कृषी कायद्यांची मागणी
हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत यांनी रद्द केलेले तीन कृषी कायदे लागू करण्याची मागणी केली.
मंडीमध्ये माध्यमांशी बोलताना कंगना रणौत म्हणालेल्या, "मला माहिती आहे की, माझे विधान वादाचा मुद्दा ठरू शकते. पण, तीन कृषी कायदे पुन्हा आणले गेले पाहिजेत. शेतकऱ्यांनी स्वतः याची मागणी केली पाहिजे."
"तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते, पण काही राज्यातील शेतकरी समूहांनी त्याला विरोध केला. त्यामुळे सरकारने ते परत घेतले. शेतकरी देशाच्या विकासातील एक स्तंभ आहे. शेतकऱ्यांना आवाहन करते की, त्यांनी त्यांच्या कल्याणासाठी कृषी कायदे परत आणण्याची मागणी केली पाहिजे", असे कंगना रणौत म्हणाल्या.
विरोधकांकडून भाजपावर टीका
कंगना रणौत यांचा व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला. "शेतकऱ्यांवर थोपवण्यात आलेले ३ काळे कायदे परत आणले पाहिजेत. भाजपा खासदार कंगना रणौत यांनी हे म्हटले आहे. देशात ७५० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले, तेव्हा कुठे मोदी सरकार झोपेतून उठले आणि काळे कायदे परत घेतले", असे काँग्रेसने म्हटले आहे.
"आता भाजपा खासदार हे कायदे परत आणण्याचा प्लॅन करत आहे. काँग्रेस शेतकऱ्यांसोबत आहे. हे काळे कायदे परत कधीही येणार नाही, मग नरेंद्र मोदी आणि त्यांचे खासदार कितीही ताकद लावू दे", अशी टीका काँग्रेसने केली.
भाजपाचा कंगना रणौत यांच्या भूमिकेपासून दुरावा
कंगना रणौत यांच्या विधानावर बोलताना भाजपा प्रवक्ता गौरव भाटिया म्हणाले, "सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भाजपा खासदार कंगना रणौत यांचा केंद्र सरकारने रद्द केलेले कृषी कायद्यांबद्दलचे एक विधान व्हायरल होत आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की, हे त्यांचे वैयक्तिक विधान आहे."
"या मुद्द्यावर कंगना रणौत या भाजपाकडून भूमिका मांडण्यास अधिकृत नाहीत. कृषी कायद्याबद्दल यात भाजपाची भूमिका नाही", असे स्पष्टीकरण भाटिया यांनी दिले. त्यांचा हा व्हिडीओ कंगना रणौत यांनी रिपोस्ट केला असून, "हो, कृषी कायद्यांवर माझे विचार व्यक्तिगत आहेत आणि ते पक्षाच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करत नाहीत", असे खासदार रणौत यांनी म्हटले आहे.