ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 21 - जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन लोकसभेत विरोधक सरकारला घेरण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाही आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वनी मारला गेल्यानंतर केंद्र सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने केला आहे. आंदोलन शमवण्यासाठी पुर्ण प्रयत्न करत असल्याचा दावा करत केंद्र सरकारने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे जम्मू काश्मीरमधील भाजपाचा मित्रपक्ष पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) बु-हान वनीच्या हत्येवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत हत्या करण्याची काय गरज होती ? असा उलट सवाल विचारला आहे. बु-हान वनी जर गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता, तर मग त्याला अगोदर अटक का करण्यात आली नाही ? असा सवाल पीडीपीचे खासदार मुझफ्फर बेग यांनी उपस्थित केला. सरकारने लष्करी अधिकाराऐवजी नैतिक अधिकाराचा वापर करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
बु-हान वनीच्या हत्येच्या निषेधार्थ पाकिस्तानने काळा दिवस जाहीर केल्याने परिस्थिती अजून बिघडली असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. मात्र आपल्या देशातील दहशतवादाला मुळासकट संपवण्यासाठी पाकिस्तान कोणतेही प्रयत्न करत नसल्याचंही सांगण्यात आलं. काश्मीरमधील लढाई भौगोलिक नसून वैचारिक असल्याचं परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री एम जे अकबर यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते ज्योतीरादित्य सिंधिया यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या 2 आठवड्यात आपल्या नव्या केंद्रीय मंत्र्यांना शुभेच्छा देण्यास, पॅरिस हल्ल्यावर दुख: व्यक्त करण्यास वेळ मिळाला, मात्र काश्मीरमधील घटनेवर एक शब्दही काढला नसल्याचं म्हटलं आहे. अफ्रिका दौ-यावरुन परतल्यावर नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली मात्र त्यामध्ये जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री उपस्थित नव्हत्या असंही ज्योतीरादित्य सिंधिया यांनी सांगितलं आहे.
एम जे अकबर यांनी चर्चेला दहशतवादाविरोधात भारताची लढाई असं स्वरुप देण्याचं आवाहन यावेळी केलं. भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत अशा परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.