पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नालंदा विद्यापीठाच्या कॅम्पसचे उद्घाटन करण्यासाठी बिहारमधील राजगीरमध्ये होते. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात, नितीश कुमार त्यांचे बोट बघत आहेत. व्हिडिओमध्ये नितीश कुमार पंतप्रधान मोदींचे डाव्या हाताचे बोट बघताना दिसत आहेत. त्याला मतदानादरम्यानची शाई होती. एवढेच नाही, तर यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींना आपले बोटही दाखवले. त्यांच्या बोटालाही शाई होती. यावेळी, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू अरविंद पनगरिया कॅम्पसच्या उद्घाटन कार्यक्रमात संबोधित करत होते.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा नितीश कुमार मोदींचा हात बघतात, तेव्हा खुद्द पंतप्रधान मोदींनाही आश्चर्य वाटते. एवढेच नाही, तर मागे बसलेले सुरक्षा रक्षकही आश्चर्याने त्यांच्याकडे बघतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याचा अंदाज लावला जात आहे.
काय म्हणाले मोदी? -आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या ४५५ एकर परिसराचे उद्घाटन केले. यावेळी मोदी म्हणाले, "तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या १० दिवसांतच मला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नालंदाला भेट देण्याची संधी मिळाली. ही बाब भारताच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. नालंदा ही एक ओळख आहे, सन्मान आहे. नालंदा एक मूल्य आहे, एक मंत्र आहे, एक अभिमान आहे, एक कथा आहे. नालंदा हे एक असे सत्य आहे, जे अग्नीच्या ज्वाळांमध्ये पुस्तके जळू शकतात, परंतु अग्नीच्या ज्वाला ज्ञान नष्ट करू शकत नाहीत, हे स्पष्टपणे सांगते."
"हा नवा कॅम्पस भारताची नवी क्षमता जगाला दाखवेल. नालंदा दाखवून देईल की जी राष्ट्रे भक्कम मानवी मूल्यांवर आधारित असतात, त्यांना इतिहासाचे पुनरुज्जीवन करून चांगल्या भविष्याचा पाया घालणे जमते," असेही मोदी म्हणाले.
"नालंदा हे केवळ भारताच्या भूतकाळाशीच निगडीत नाही, तर जगातील आणि आशियातील अनेक देशांचा वारसा त्याच्याशी निगडीत आहे. आमच्या भागीदार देशांनीही नालंदा विद्यापीठाच्या पुनर्बांधणीत सहभाग घेतला आहे. या निमित्ताने मी भारताच्या सर्व मित्र देशांचेही अभिनंदन करतो. प्राचीन नालंदामध्ये मुलांचा प्रवेश त्यांची ओळख किंवा राष्ट्रीयत्वाच्या आधारावर केला जात नव्हता. प्रत्येक देशातून आणि प्रत्येक वर्गातील तरुण इथे यायचे. नालंदा विद्यापीठाच्या या नव्या कॅम्पसमध्ये पुन्हा तीच प्राचीन व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवली जाईल. 'वसुधैव कुटुंबकम्' याचे नालंदा हे सुंदर प्रतीक आहे," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.