कोलकाता - फुटबाॅलपटू बायचुंग भुतियाने तृणमूल काॅग्रेसपक्षाला रामराम केला आहे. २०११ साली खेळातून निवृत्त झालेल्या बायचुंगने दोन वर्षांनंतर तृणमूल काँग्रेसद्वारे राजकारणात प्रवेश केला होता. मात्र तृणमूलमध्ये प्रवेश मिळूनही तो फारशी चनक दाखवू शकला नाही. फुटबाँलपटू म्हणून पश्चिम बंगालमध्ये त्याने जोरदार प्रसिद्धी मिळवली असली तरी त्या प्रसिद्धीचे रुपांतर तो मतांमध्ये करु शकला नाही. अाता त्याने तृणमूल काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
२०१३ साली त्याने तृणमूलमध्ये प्रवेश मिळवून दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघातून २०१४ साली निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्याला भाजपाच्या एस.एस. अहलुवालिया यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. अहलुवालिया यांना ४ लाख ८८ हजार २५७ मते तर बायचुंगला २ लाख ९१ हजार ०१८ मते मिळाली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सुमन पाठक यांना १ लाख ६७ हजार १८६ मते तर काँग्रेसच्या सुजय घातक यांना ९० हजार ०७६ मते मिळाली.
लोकसभेत पराभव झाल्यावर तृणमूलने २०१६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याला सिलिगुडी मतदारसंघातून संधी दिली. यावेळेसही त्याला यश मिळाले नाही. माकपाच्या अशोक भट्टाचार्य यांनी त्याचा पराभव केला. यानंतर आता पक्षाचा राजीनामा देणेच त्याने पसंत केले आहे.
बायचुंगने आपण तृणमूलचा राजीनामा दिल्याचे आणि आपण आता कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नसल्याचे ट्वीटरवर स्पष्ट केले आहे. मात्र बायचुंग आता भाजपात जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. भाजपा सध्या ईशान्य भारतातील सातपैकी ३ राज्यांमध्ये सत्तेत आहे आणि मेघालय, त्रिपुरा नागालँडमध्ये सत्तेत येण्याची या पक्षाला आशा आहे. ईशान्य भारतात अधिक वेगाने पसरण्यास बायचुंगसारख्या लोकप्रिय खेळाडूचा उपयोग भाजपाला होऊ शकेल. गोरखालँड आंदोलनाला पाठिंबा देऊन बायचुंगने तृणमूलच्या धोरणाशी फारकत आधीच घेतली होती. त्यामूळे पक्षातून बाहेर जाण्याचे संकेत मिळत होते, अखेर त्याने राजानामा देऊन पक्षाबाहेर जाणे पसंत केले आहे. बायचुंगने नुकतीच प्रशांत भूषण यांचीही भेट घेऊन त्याचे गृहराज्य सिक्किमबद्द्ल विविध विषयैंवर चर्चा केली होती.