नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आपली दिवाळी यंदा कन्याकुमारीच्या सेंट जोसेफ मॅट्रीक हायर सेकेंडरी स्कूलच्या विजिटर्ससोबत साजरी केली आहे. यादरम्यान त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांसोबत संवाद साधला. राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. सेंट जोसेफ स्कूलच्या मित्रांसोबत संवाद साधला आणि रात्रीचं जेवण केलं. यामुळे यंदाची दिवाळी अधिकच खास बनली असं देखील ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी राहुल यांनी काही खास प्रश्नांची उत्तरं देखील दिली आहेत.
राहुल गांधी यांनी विविध संस्कृतींचा हा संगम आपल्या देशासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण हे जपायला हवा असं म्हटलं आहे. याच दरम्यान एका व्यक्तीने राहुल गांधींना काँग्रेसचं सरकार आल्यास पंतप्रधान म्हणून पहिला निर्णय काय घ्याल? अशा प्रश्न विचारला. यावर राहुल गांधींनी महिला आरक्षण असं पटकन उत्तर दिलं. राहुल गांधी यांनी जर पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय महिला आरक्षणाबाबत असेल असं म्हटलं आहे. तसेच विद्यार्थ्यांसोबत संवाद करताना राहुल गांधी म्हणाले, जर कोणी मला विचारलं की मी माझ्या मुलांना काय शिकवेल, तर याचं उत्तर विनम्रता असं असेल. कारण विनम्रतेमुळेच तुम्हाला समज येते.
"मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशील हृदय असावं अशी इच्छा"
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. दिवाळीच्या काळात महागाई शिगेला पोहोचली आहे म्हणत टीकास्त्र सोडलं होतं. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं होतं. मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशील हृदय असावं अशी इच्छा देखील व्यक्त केली. "आज दिवाळी आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. हा विनोद नाही. मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशील हृदय असावं अशी इच्छा आहे" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसेच आता सिलिंडरच्या दरवाढीवरून विरोधक केंद्र सरकार जोरदार हल्लाबोल करत आहेत.