नवी दिल्ली : इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना तौकीर रझा खान यांनी रविवारी एक वादग्रस्त विधान केले आहे. हिंदू राष्ट्राची मागणी करणार्यांची भाषा मान्य असेल, तर खलिस्तान किंवा वेगळ्या मुस्लिम राज्याची मागणी देखील मान्य असली पाहिजे, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, उद्यापासून आमच्या मुस्लिम तरुणांनी वेगळ्या मुस्लिम राज्याची मागणी केली तर काय होईल? तसेच आम्हाला आमच्या देशाचे पुन्हा विभाजन करायचे नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही आक्षेपार्ह टिप्पणी केली. लक्षणीय बाब म्हणजे त्यांनी पंतप्रधान मोदींना धृतराष्ट्र असे संबोधले. मुस्लिमांची हत्या करणाऱ्या आणि इस्लामचा विरोध करणाऱ्यांना मोदी सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या महिला राष्ट्रपती आमच्या सूचना गांभीर्याने ऐकतील, अशी अपेक्षा असल्याचे तौकरी रझा यांनी सांगितले. देशात हिंदू-मुस्लिम यांच्या नावाखाली जातीय हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ओळखून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्यांवरही कारवाई करा - खान तसेच, खलिस्तानची मागणी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून मोदी सरकारने कारवाई करावी, असा आग्रह इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केला. हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्यांवरही अशीच कारवाई व्हायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तौकीर रझा यांनी आणखी म्हटले की, सरकारचा दुटप्पीपणा खपवून घेतला जाणार नाही. एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, हिंदू संघटनांनी सुमारे दहा लाख मुस्लिम मुलींना आमिष दाखवले आहे. 'घर वापसी'च्या नावाखाली अपहरण केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना धमकावून हिंदू मुलांशी लग्न करायला लावले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"