श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात करण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती आणि दिल्लीतील वाढत्या हालचालींमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. काश्मीरमध्ये काय होणार आहे, याची माहिती कुणीही देत नाही आहे, असे त्या म्हणाल्या.
काश्मीरमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना महेबुबा मुफ्ती यांनी सांगितले की, "काश्मीरवर संकट कोसळले आहे. इथे काय होणार आहे याची माहिती कुणीही सांगत नाही आहे. दरम्यान, मी रविवारी एका हॉटेलमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र पोलिसांनी त्या हॉटेलचे बुकिंग रद्द केले," असा आरोप त्यांनी केला.
काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली तैनाती आणि एकापाठोपाठ एक सूचना जारी होत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 आणि कलम 35 (अ) हटवण्याची तयारी सुरू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय जम्मू -काश्मीरचे जम्मू, काश्मीर आणि लडाख असे त्रिभाजन करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दरम्यान, काश्मीर खो-यात प्रचंड प्रमाणात सशस्त्र पोलीस पाठविण्यात आल्यामुळे तिथे तणाव वाढला असून, काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या भीतीने भाजीपाला, अन्नधान्य, तसेच पेट्रोल खरेदीसाठी शनिवारी प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आणि बँका व एटीएममधून पैसे काढण्यासाठीही लोकांनी गर्दी केली. इतके सशस्त्र पोलीस कशासाठी आणले, हे केंद्र सरकार वा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट न केल्याने तिथे गोंधळाचे वातावरण आहे. लोकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये व संयम बाळगावा, असे राज्यपालांनी म्हटले आहे.
२५0 अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत
पाकिस्तानच्या सीमेवरील विविध लाँच पॅडवर सध्या २00 ते २५0 दहशतवादी सज्ज आहेत आणि ते काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत, असे लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेत गेले, तेव्हा या सर्व दहशतवाद्यांनी सीमेवरून हटविण्यात आले होते. इम्रान खान परतताच अतिरेकी पुन्हा लाँच पॅडवर आले आहेत, असे या अधिका-याचे म्हणणे आहे.