लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सोन्याचे दागिने आणि आभूषणांवर १६ जूनपासून हॉलमार्क बंधनकारक करण्यात आला असला तरी नागरिकांना त्यांचे जुने हॉलमार्क नसलेले दागिने विकण्यास मुभा असेल. जर व्यावहारिक असेल तर ज्वेलर्स जुने दागिने वितळवून हॉलमार्कसह नवे दागिने तयार करू शकतात, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. १६ जूनपासून २५६ जिल्ह्यांमध्ये हाॅलमार्क बंधनकारक करण्याची योजना टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल तसेच ऑगस्ट २०२१ पर्यंत याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही असे, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी ज्वेलर्स आणि उद्योजकांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले.
Gold Hallmarking: साेन्याचे दागिने घेताना नजर तीक्ष्ण ठेवा; आजपासून हाॅलमार्किंग बंधनकारक
या २५६ जिल्ह्यांमध्ये सोनारांना केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटचे दागिने विकता येतील. २०, २३ आणि २४ कॅरेटचे दागिनेही बनविता येतील. घड्याळे, फाऊंटेन पेन तसेच कुंदन, पोल्की, जडाऊ आदी आभूषणांमध्ये वापरलेल्या सोन्यावर हॉलमार्कमधून सूट देण्यात आली आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारने २०१९ मध्ये सोन्याचे दागिने व आभूषणांवर १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर याला आणखी चार महिने मुदत वाढवून दिली होती. कोरोनामुळे ज्वेलर्स तसेच उद्योजकांनी विनंती केल्याने ही मुदत १५ जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. (वृत्तसंस्था)