ललित झांबरे -
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४ मतदारसंघात २५ मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात १६२ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. त्यात मनेका गांधी, जगदंबिका पाल, कृपाशंकर सिंह, दिनेश लाल यादव असे दिग्गज उमेदवार आहेत. या टप्प्यात ज्या १४ मतदारसंघांत निवडणूक आहे, २०१९ मध्ये त्यांपैकी ९ ठिकाणी भारतीय जनता पक्ष, चार ठिकाणी बहुजन समाज पार्टी आणि एका जागेवर समाजवादी पार्टीने यश मिळवले होते. आता यावेळी भाजप ही संख्या वाढवणार का, याची उत्सुकता आहे.
गेल्या १५ वर्षांपासून डुमरियागंजचे खासदार राहिलेले जगदंबिका पाल हे भाजपसाठी पुन्हा एकदा रिंगणात आहेत. लालगंजमध्ये बसपाने विद्यमान खासदार संगीता आझाद यांना पुन्हा तिकीट न देता इंदू चौधरी यांच्यावर दाव लावला आहे. त्यांची लढत भाजपच्या नीलम सोनकर व सपाचे प्रसाद सरोज या माजी खासदारांशी आहे.
भदोही मतदारसंघात माजी मुख्यमंत्री कमलापती त्रिपाठी यांचे नातू ललितेशपती हे रिंगणात आहेत. राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांचा मुलगा साकेत मिश्र हा श्रीवस्ती मतदारसंघातून लढत आहे. त्याच्याविरोधात बसपाने यावेळी मोईनुद्दीन अहमदखान या मुस्लीम उमेदवाराला मैदानात उतरवले आहे.
२६ वर्षांचा तरुण चेहरा चमत्कार करणार?आजमगढमध्ये भाजपचे खासदार दिनेशलाल यादव यांची लढत सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे चुलतभाऊ धर्मेंद्र यादव यांच्याशी आहे. मछलीशहर मतदारसंघात भाजपतर्फे बी. पी. सरोज हॅटट्रिक साधण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या वेळी ते फक्त १८१ मतांनी जिंकले होते. सपाने त्यांच्याविरोधात अवघ्या २६ वर्षांच्या प्रिया सरोज हा तरुण चेहरा दिला आहे.
सुल्तानपूरवासी मनेका गांधी यांना पुन्हा एकदा साथ देतात का, हे या टप्प्यात ठरणार आहे. महाराष्ट्रात मंत्री राहिलेले कृपाशंकर सिंह हे यावेळी मातृभूमी जौनपूरमधून भाजपतर्फे रिंगणात आहेत. अलाहाबादमध्ये भाजपने विद्यमान खासदार रिता बहुगुणा जोशी यांच्याऐवजी नीरज त्रिपाठी यांच्यावर विश्वास दाखवला आहे.