जयपूर - राजस्थानात बहुतांश एक्झिट पाेलच्या आकडेवारीनुसार काँग्रेस फार मागे नाही. त्यामुळे दाेन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत हाेऊन समान संधी मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. अशा वेळी राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री अशाेक गेहलाेत आणि सचिन पायलट यांच्यात पुन्हा रस्सीखेच पाहायला मिळू शकते. मात्र, पायलट यांच्या वाट्याला काय येणार, याबाबत जाेरदार चर्चा सुरू आहे.
गेल्या निवडणुकीत काँग्रेसला १०० जागा मिळाल्या हाेत्या. अशाेक गेहलाेत मुख्यमंत्री झाल्यानंतर बसपचे ६ आमदार काँग्रेसमध्ये गेले हाेते. यावेळीही काँग्रेसला बहुमत मिळाल्यास त्याचे श्रेय गेहलाेत यांनाच दिले जावे, असे मानणारा एक माेठा वर्ग आहे. सत्तेचे समीकरण बराेबरीत आल्यास बहुमतासाठी एकेक मत बहुमूल्य ठरेल. अशा वेळी पायलट यांना संधी मिळू शकते. एक्झिट पाेलनुसार राज्यात भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे.
...तर पायलट यांना मिळेल संधी- गेल्या सरकारमध्ये पायलट यांना फार काही मिळाले नाही. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, पक्ष नेतृत्त्वाने त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवले.- काँग्रेसला बहुमतासाठी संघर्ष करावा लागल्यास पायलट यांना मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्याची संधी मिळू शकते.- पायलट समर्थक असलेले जास्त आमदार निवडल्यास पायलट यांची स्थिती मजबूत हाेईल. अशावेळी गेहलाेत यांना बॅकफूटवर जावे लागेल. - त्यासाठी पायलट यांच्याकडील आकडे फार महत्त्वाचे ठरणार आहेत. गेल्या वेळी आकड्यांची साथ नसल्यामुळे ते बंडखाेरी करून ज्याेतिरादित्य सिंधिया यांच्याप्रमाणे सरकार पाडण्याच्या स्थितीत नव्हते.