ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 28 - दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीचा "झाडू"न दणदणीत पराभव झाल्यानंतर पार्टीतील अंतर्गत तक्रारी व संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागलेला असताना आता पंजाब येथे पक्षात बंडाळीचा धोका वर्तवण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर पंजाबमधील "आप"चे संयोजक गुरप्रीत सिंह घुग्गी यांनी तसा इशारा देत पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे.
घुग्गी यांनी गुरुवारी सांगितले की, "सध्या सर्वांना एकत्र ठेवणे गरजेचं आहे". यावेळी त्यांनी विरोधकांकडून "आप"चे आमदार गळाला लावले जाण्याची शंकादेखील उपस्थित केली. ज्या प्रकारे "आप"कडून स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे ही नाराज लोकं पार्टीला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात आहेत, असे घुग्गी यांनी सांगितले. त्यामुळे पार्टीला धोरणांमध्ये तातडीने सुधारणा करणं आवश्यक आहे, असे मतदेखील घुग्गी यांनी मांडले आहे.
यादरम्यान, पार्टीमध्ये फुट पडणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. पार्टीतील दोन नेत्यांनी काँग्रेससोबत मागील दरवाजाने संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, संबंधित नेत्यांनी हे वृत्त फेटाळून लावत, पक्षनेतृत्व आत्मचिंतन करुन योग्य ते बदल करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात "आप"मधील काही लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसंच पंजाबमधील पार्टीच्या नवीन प्रमुखाचीही घोषणा होऊ शकते.
दरम्यान, दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या झालेल्या पराभवानंतर पार्टीमधील अनेक पदाधिका-यांनी आपले राजीनामे सुपुर्द केलेत. दिल्लीतील पार्टीचे अध्यक्ष दिलीप पांडे, दिल्लीचे प्रभारी आशिष तलवार, पंजाबमधील पार्टीचे सह-प्रभारी दुर्गेश पाठक यांच्यासहीत अन्य नेत्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपआपल्या पदाचा राजीनामा दिला.
पंजाबमधील "आप"चे प्रभारी संजय सिंह, दिल्लीतील पार्टीचे अध्यक्ष दिलीप पांडे असोत किंवा दुर्गेश पाठक ही सर्व नेतेमंडळी अरविंद केजरीवाल यांच्या अगदी जवळील असल्याचे मानले जाते. या नेत्यांना पंजाब विधानसभा निवडणूक आणि दिल्लीतील मनपा निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र या निवडणुकांमध्ये आपचा सुपडा साफ झाला.
यादरम्यान, संजय सिंह आणि दुर्गेश पाठक यांच्यावर पंजाबमध्ये तिकीट वाटपाचा आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र अरविंद केजरीवाल यांना या सर्व नेत्यांवर विश्वास होता. मात्र, दिल्ली मनपा निवडणुकीतील "आप"चा दणदणीत पराभव पाहता पार्टीतील वाद तसंच असंतोष टाळण्यासाठी आता आपमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.