संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी काय बोलणार? काँग्रेसला चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 10:20 AM2018-05-30T10:20:12+5:302018-05-30T10:20:12+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

What will Pranab Mukherjee say in the Sangh program? Concern for Congress | संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी काय बोलणार? काँग्रेसला चिंता

संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी काय बोलणार? काँग्रेसला चिंता

Next

नवी दिल्ली -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या कार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या मुखर्जी यांच्या निर्णयामुळे काँग्रेसची गोची झाली असून, 7 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात मुखर्जी नेमके काय बोलणार याची चिंती काँग्रेसला लागली आहे.  
7 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणव मुखर्जी यांना स्वत: निमंत्रित केले होते. हे निमंत्रण मुखर्जी यांनी स्वीकारल्याने आता प्रणव मुखर्जी आणि सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे एकाच मंचावर येणार आहेत. एकेकाळी कॉंग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात येणार असल्याचे निश्चित झाल्यामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणाचे लक्ष या कार्यक्रमाकडे असेल.  मात्र संघाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या प्रणव मुखर्जींच्या निर्णयावर टीकाही होत आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी प्रणव मुखर्जींच्या निर्णयावर टीका केली आहे. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने या घटनाक्रमाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले असून, त्यांच्याकडून संघाच्या कार्यक्रमाची वाट पाहिली जात आहे. 
याबाबत विचारणा केली असता काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कन यांनीही याबाबत अधिक बोलणे टाळले. मात्र काँग्रेस आणि संघाच्या विचारसरणीमध्ये मोठी तफावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे अन्य एक वरिष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, "मुखर्जी यांनी राष्ट्रपती बनल्यानंतर राजकारण सोडले आहे. आता कोणत्याही समारंभात त्यांचे बोलणे हे त्यांच्या भूमिकेबाबतचा संकेत असू शकत नाही. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीदरम्यान जे राजकीय मानदंड स्थापित केले त्यावरून त्यांच्या योगदानाचे मूल्यांकन केले गेले पाहिजे."
 दरम्यान,  प्रणव मुखर्जींचे निकटवर्तीय असलेल्यांचे म्हणणे आहे की, माजी राष्ट्रपती या कार्यक्रमात संघाच्या स्वयंसेवकांना राष्ट्रवादाच्या खऱ्या व्याख्येची ओळख करून देऊ शकतात. अशा परिस्थितीत मुखर्जी यांचे भाषण हिंदुत्ववाद्यांच्या राष्ट्रवादाच्या एकांगी व्याख्येवर टीका करणारेही असू शकते. मात्र असे असले तरी प्रणव मुखर्जी यांची संघाच्या कार्यक्रमातील उपस्थिती काँग्रेस आणि सेक्युलर विचारांसाठी धक्का असल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले आहे.   

Web Title: What will Pranab Mukherjee say in the Sangh program? Concern for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.