२८ मे २०२३ हा दिवस भारतीयसंसदीय इतिहासामध्ये ऐतिहासिक ठरणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नवनिर्मित भवनाचं उद्घाटन करणार आहेत. २०१९ मध्ये लोकसभा आणि राज्यसभेने नवे संसद भवन बांधण्याबाबत सरकारकडे आग्रह केला होता. त्यानंतर १० डिसेंबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नव्या भवनाची पायाभरणी केली होती. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाची तारीख जवळ येत असतानाच अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेल्या जुन्या संसद भवनाचं काय होणार हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे.
लोकसभा सचिवालयाकडून संसद भवनाबाबत तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेनुसार नव्या संसदेच्या उद्घाटनानंतरही जुन्या संसदेच्या इमारतीचा वापर सुरू राहील. तसेच दोन्ही इमारती एकमेकांना पुरक म्हणून काम करतील. सन २०२१ च्या मार्च महिन्यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर जुन्या संसदेची दुरुस्ती केली जाईल. त्याचा वापर संसदेशी संबंधित कार्यक्रमांच्या आयोजनासाठी केला जाईल. जुने संसद भवन हे देशातील सर्वात मोठ्या वास्तूंपैकी एक आहे. त्याचं बांधकाम प्रसिद्ध वास्तुकार सर एडविन लुटियन्स आणि सर हरबर्ट बेकर यांच्या देखरेखीखाली करण्यात आलं होतं. या वास्तूचं उदघाटन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन याने १८ जानेवारी १९२७ रोजी केलं होतं. त्यावेळी त्याच्या बांधकामासाठी ८३ लाख रुपये खर्च झाले होते.
आता नव्याने बांधलेले संसद भवनही तितकेच भव्य आणि अत्याधुनिक सोईसुविधांनी सज्ज आहे. या संसद भवनामधील लोकसभेमध्ये ८८८ आणि राज्यसभेत ३८४ सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था असेल. तर संयुक्त अधिवेशनावेळी १२७२ सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था असेल. नव्या संसद भवनामध्ये लोकसभेला राष्ट्रीय पक्षी मोराच्या आकारामध्ये तर राज्यसभेला राष्ट्रीय फूल कमळाच्या आकारामध्ये आणि भूकंपरोधी डिझाईनमध्ये तयार करण्यात आलं आहे.