आदिवासींसाठी काय काम केले? यशवंत सिन्हा यांचा सवाल, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:03 AM2022-06-28T11:03:58+5:302022-06-28T11:04:40+5:30
यशवंत सिन्हा यांनी आज राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सपाचे अखिलेश यादव, कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, डी. राजा, टीएमसीचे अभिजित बॅनर्जी, सुखेंदू शेखर रॉय उपस्थित होते.
नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदासाठी आदिवासी महिला उमेदवाराची निवड केली. अशा प्रतीकांची दवंडी पिटण्याऐवजी गेल्या आठ वर्षात आदिवासींसाठी काय काम केले, याची माहिती मोदी सरकारने जनतेला द्यावी, असे आव्हान विरोधकांचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी दिले.
यशवंत सिन्हा यांनी आज राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सपाचे अखिलेश यादव, कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, डी. राजा, टीएमसीचे अभिजित बॅनर्जी, सुखेंदू शेखर रॉय उपस्थित होते.
यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारच्या एकूणच कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, की लोकशाही ज्या स्तंभावर उभी आहे, ते स्तंभ ढासळू लागल्याने देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. ही लढाई केवळ राष्ट्रपतिपदासाठी नाही तर यापुढेही विरोधकांचे ऐक्य कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्तारूढ पक्षातर्फे आदिवासी महिलेला उमेदवारी दिल्याचा दावा केला जात आहे. यावर बोलताना सिन्हा म्हणाले, ही लढाई प्रतीकांची नाही. मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात अनुसूचित जाती व जमातीसाठी काय केले, याची माहिती द्यावी. विरोधकांकडून याची संकलित केलेली माहिती लवकरच जनतेला उपलब्ध करून दिली आहे. केवळ प्रतीकांमुळे विकास होत नाही. त्यासाठी त्या समाजाच्या विकासाला कोणताही हातभार लागत नसल्याचेही यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केले.
भाजपचे नेते संपर्कात
यावेळी बोलताना सिन्हा यांनी भाजपचे काही सदस्य आपल्या संपर्कात आहेत. राजकीय कारकिर्दीतील बराच काळ व्यतीत झाला. यामुळे काही संबंध निश्चित आहे. या संबंधाचा मला फायदा मिळेल, असा दावा सिन्हा यांनी केला. यावेळी सुधींद्र कुलकर्णी उपस्थित होते.
टीआरएसची उपस्थिती महत्त्वाची
तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते के. टी. रामा राव यांची यावेळी उपस्थिती होती आणि ती महत्वाची मानली जात आहे. २८ जूनपासून यशवंत सिन्हा हे तामिळनाडूतून आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करु शकतात. पहिल्या टप्प्यात ते कर्नाटक व केरळचा दौरा करु शकतात.
निवडणूक अभियान समितीची स्थापन
सिन्हा यांच्या प्रचारासाठी ११ सदस्यीय निवडणूक अभियान समिती स्थापन केली आहे. यात काँग्रेसचे जयराम रमेश, द्रमुकचे तिरुची शिवा, तृणमूलचे सुखेंदु शेखर रॉय, माकपाचे सीताराम येचुरी, सपाचे रामगोपाल यादव, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, टीआरएसचे रंजीत रेड्डी, राजदचे मनोज झा, भाकपाचे डी. राजा आणि सुधींद्र कुलकर्णी यांचा यात समावेश आहे. शिवसेनेकडून एक सदस्य नियुक्त केला जाईल.