नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना काँग्रेसवर बोचरी टीका केली. काँग्रेस नसती तर देशाचं काय झालं असतं, येथे वारंवार बोललं गेलं. मात्र महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही झालं नसतं असं सांगत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.
राज्यसभेमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात जे काही झालं तर काँग्रेसने केलं, काँग्रेस नसती तर काय झालं असतं, असं इथे वारंवार बोललं गेलं. पण खरंच काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही घडलं नसतं. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस नसती तर देशाची लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहीली असता. काँग्रेस नसती तर देशात आणीबाणी लागली नसती. काँग्रेस नसती तर शीखांचा नरसंहार झाला नसता. काँग्रेस नसती तर काश्मिरी पंडितांचे पलायन झाले नसते. काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार नसता. काँग्रेस नसती तर जातीवाद नसता. काँग्रेस नसती तर अधिक विकास झाला असता, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.
यावेळी राहुल गांधींनी मांडलेल्या फेडरल स्ट्रक्चरच्या मुद्द्यावरूनही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. सभागृहात सांगण्यात आले की, काँग्रेसने भारताची पायाभरणी केली आणि भाजपाने त्यावर झेंडा लावला. काही लोकांना वाटते की, भारत १९४७ मध्ये निर्माण झाला. याच विचारामुळे अडचणी निर्माण झाल्या. ज्यांना ५० वर्षे काम करण्याची संधी मिळाली, त्यांनी काहीच केलं नाही. १९७५ मध्ये लोकशाहीचा गळा आवळणाऱ्यांनी लोकशाहीवर बोलू नये. भारतीय लोकशाहीला घराणेशाही असलेल्या पक्षांपासून मोठा धोका आहे. जेव्हा एखाद्या पक्षामध्ये कुटुंब सर्वोच्च होते. तेव्हा त्या पक्षामध्ये सर्वप्रथम टॅलेंटचे नुकसान होते, असा टोला मोदींनी लगावला.