ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - एअर इंडियाच्या एका वरिष्ठ वैमानिकाने खासदारांच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी एअर इंडियाच्या कर्मचा-यांच्या बांधिलकीमध्ये काहीतरी कमतरता आहे, ज्यामुळे खासगी एअरलाइन्सपेक्षा ते मागे आहेत असं वक्तव्य करत नाराजी व्यक्त केली होती.. गजपती राजू यांच्या या वक्तव्यावर नाराज झालेल्या एअर इंडियाच्या शुभाशीष मजूमदार यांनी गजपती राजू यांना पत्र पाठवून खासदारांच्या बांधिलकीवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे.
या पत्राला 'Lagging In Inspiration, Not Commitment' म्हणजेच 'प्रेरणेची कमतरता आहे, बांधिलकीची नाही' असं शिर्षक देण्यात आलं आहे. 'एअर इंडियाचा एक वचनबद्द कर्मचारी, प्रामाणिक टॅक्सपेअर आणि देशभक्त नागरिक असल्याच्या नात्याने एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज पुर्णपणे अयशस्वी राहिलं. लोकसभेच्या कामकाजाचे 92 तास वाया गेले, मुश्किलीने काही काम झालं असेल. तुमच्या सहका-यांनी घोषणाबाजी करत, पोस्टर दाखवत, गोंधळ घालत कामकाजात अडथळा आणला', असं पत्रात लिहिण्यात आलं आहे.
पत्रात पुढे लिहिण्यात आलं आहे की, 'इतर देशांशी तुलना करत आपल्या देशातील नेता बांधिलकीमध्ये खूप मागे असल्याचं पाहून आम्ही एअर इंडियाचे कर्मचारी खूप दुखी: आहोत'. 'जर आम्ही कर्मचारी नेते आणि खासदारांप्रमाणे वागलो असतो तर आमच्यावर लगेच निलंबनाची कारवाई नसती करण्यात आली, पण नक्कीच सुनावण्यात आलं असतं', असा टोला पत्रातून लगावण्यात आला आहे. 'देशाच्या एअरलाइन्सचे कर्मचारी आणि भारताचे नागरिक या नात्याने आम्ही अपेक्षा करतो की आमचे नेता आत्मपरिक्षण करतील आणि एक उदाहरण उभं करतील', अशी आशा शुभाशीष मजूमदार यांनी व्यक्त केली आहे.
एअर इंडियाच्या दुस-या कर्मचा-याने गजपती राजू यांच्या वक्तव्याला सकारात्मकपणे घेतलं पाहिजे, प्रवाशांच्या चांगल्या सोयींसाठी अजून प्रयत्न केले पाहिजेत असं म्हटलं आहे. तसंच गजपती राजू यांच्या वक्तव्यामुळे एअर इंडियाचे अनेक कर्मचारी नाराज असल्याचंही ते बोलले आहेत. एअर इंडियाने मात्र शुभाशीष मजूमदार यांचं हे वैयक्तिक मत असून यासंबंधी आम्हाला काहीच बोलायचं नसल्याचं सांगितलं आहे.
एअर इंडियाचे कर्मचारी प्रतिस्पर्धी विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेच्या तुलनेत मागे आहेत. कंपनी टिकून राहिली तरच नोकरी सुरक्षित राहील, अशा शब्दांत नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी संकेत दिले.
गजपती राजू म्हणाले, स्पर्धक कंपन्यांच्या काही कर्मचाऱ्यांनी दाखवलेली निष्ठा आणि एअर इंडियाच्या काही कर्मचाऱ्यांनी दाखवलेली निष्ठा यात काही अंतर आहे. ही संतुष्टता एअर इंडियातील नोकरीची काळजी नसण्याच्या भावनेतून निर्माण झाली आहे का असे विचारता गजपती राजू म्हणाले की नोकरीची हमी आहे पण जो पर्यंत एअर इंडिया टिकून आहे तोपर्यंतच. जेथे संस्था टिकून राहतात तेथेच नोकरीही टिकून राहते. जेव्हा संस्थाच राहात नाही तेव्हा तुमच्या नोकरीचे काय होणार असा प्रश्न त्यांनी विचारला होता.