स्वत:चे नाव काय असावे, हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार - केरळ हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:14 PM2020-05-04T23:14:02+5:302020-05-04T23:14:14+5:30
नाव ही व्यक्तीची अभिव्यक्ती; वाजवी कारणाखेरीज सरकार त्यात अडथळे आणू शकत नाही
कोची : स्वत:ला काही तरी नाव असणे आणि ते नाव आपल्याला हव्या त्या प्रकारे जगापुढे व्यक्त करणे हा भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि आयुष्य स्वत:ला हवे तसे जगण्याच्या मूलभूत अधिकाराचाच एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीस आपले नाव बदलायचे असेल तर सरकार, रास्त व वाजवी कारणाखेरीज, त्यात अडथळे आणू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
कशिश गुप्ता या विद्यार्थिनीने केलेल्या याचिकेवर हा निकाल देताना न्या. बेचू कुरियन थॉमस यांनी म्हटले की, चार शतकांपूर्वी विल्यम शेक्सपिअरने ‘रोमिओ अॅण्ड ज्युलिएट’ या त्याच्या नाटकात ‘नावात काय विशेष आहे?’ असा प्रश्न उपस्थित केला होता; पण आताच्या काळात हाच प्रश्न विचारला तर ‘नावातच सर्व काही आहे’ असे त्याचे उत्तर द्यावे लागेल.
न्यायालयाने म्हटले की, स्वत:चे नाव ही प्रत्येक व्यक्तीची अगदी खासगी बाब असते. नावातून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, ओळख व वेगळेपण व्यक्त होत असते. कोणतीही व्यक्ती तिच्या नावानेच जगापुढे जात असते. व्यक्तीच्या सामाजिक व्यवहारांचा तिचे नाव हाच पाया असतो. लोकशाहीमध्ये आपले नाव आपल्याला हवे त्या प्रकारे समाजापुढे अभिव्यक्त करणे हा त्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार ठरतो.
विद्यार्थिनीचे नाव बदलण्यास ‘सीबीएसई’ने का दिला नकार?
कशिश गुप्ता ही ‘सीबीएसई’ची इयत्ता १२ वीची परीक्षा दिलेली विद्यार्थिनी आहे. इयत्ता १० वीपर्यंत कोची येथील चिन्मय विद्यालयात शिकत असताना तिचे नाव डिंकी गुप्ता असे होते. इयत्ता ११ वीची परीक्षा तिने डिंकी गुप्ता या नावानेच दिली; पण इयत्ता १२ वीच्या परीक्षेच्या आधी तिने स्वत:चे नाव कशिश असे बदलून घेतले. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून नावातील हा बदल केरळ सरकारच्या राजपत्रात रीतसर प्रसिद्ध झाला.
शाळेने त्यांच्या रेकॉर्डमध्ये तिचे नाव बदलले व तिला ‘सीबीएसई’कडून इयत्ता १२ वीच्या परीक्षेचे ‘हॉल तिकीट’ही या बदललेल्या नावाचे देण्यात आले. परंतु तिचे इयत्ता ११ वीचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका ‘डिंकी’ या जुन्याच नावाची होती. ती नव्या नावानुसार बदलून घेण्यासाठी तिने शाळेमार्फत अर्ज केला; परंतु एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही परीक्षेच्या प्रमाणपत्रातील व गुणपत्रिकेतील नाव बदलता येत नाही, या नियमावर बोट ठेवून ‘सीबीएसई’ने नाव बदलण्यास नकार दिला.
12 वीचा निकाल लवकरच जाहीर होईल व कशिशला पुढील प्रवेशासाठी सर्व प्रमाणपत्रे व गुणपत्रिका द्याव्या लागतील. नावातील तफावतीमुळे तिला खूप अडचणी येतील, हे लक्षात घेऊन न्यायालयाने उन्हाळी सुटी व ‘लॉकडाऊन’ असूनही तिच्या याचिकेवर तातडीने ‘व्हिडिओ सुनावणी’ घेऊन वरीलप्रमाणे निकाल दिला. ‘सीबीएसई’ने कशिशला सुधारित नावाचे प्रमाणपत्र व गुणपत्रक सहा आठवड्यांत जारी करावे, असा आदेश दिला गेला.