नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणाच्याही बाजूने झाला तरी आम्ही त्याचा आदर करू, असे जमियत उलेमा-ए-हिंद या मुस्लिम धर्मगुरूंच्या संघटनेचे प्रमुख मौलाना अर्शद मदनी यांनी बुधवारी ठामपणे सांगितले व इतर सर्वांनीही निकालाचा आदर करावा, असे आवाहन केले.
मौलाना मदनी म्हणाले की, बाबरी मशिद ही शरियतनुसार स्थापन झालेली मशिद होती व न्यायालयाचा निकाल काहीही झाला तरी अनादी कालापर्यंत तिचे तेच स्वरूप कायम राहील, अशी आमची ठाम भावना आहे. ते असेही म्हणाले की, बाबरी मशिद तेथे पूर्वी असलेले कोणतेही हिंदू मंदिर पाडून बांधलेली नाही, हे ऐेतिहासिक सत्य आहे. वादग्रस्त जागेवरील मुस्लिमांचा दावाही याच सत्यावर आधारित आहे. या वादाचा निकाल श्रद्धा व भावनेच्या आधारे नव्हे तर ठोस तथ्ये व पुराव्यांच्या आधारे व्हायला हवा, असे आमचे म्हणणे आहे.