नवी दिल्ली - भारतातील लोकांचे सरासरी आयुष्य तब्ब्ल दहा वर्षांनी वाढले आहे. 'द लॅन्सेट जर्नल'या लेखातून ही माहिती समोर आली आहे. या लेखात भारतीय पुरुषांची आयुर्मर्यादा 66.9 वर्षे आणि महिलांची 70.3 वर्षे एवढी असल्याचे म्हटले आहे. दोन हजार वांशिक गटातील 1.34 अब्ज भारतीय लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करुन हे विश्लेषण करण्यात आले आहे.1990 सालच्या तुलनेत हिंदुस्थानच्या आयुर्मर्यादेमध्ये सरासरी दहा वर्षांची वाढ झाली आहे. परंतु ही वाढ संपूर्ण भारतातील समान झाली नसून विविध राज्यांच्या आयुर्मयादेच्या वाढीमध्ये मोठा फरक असल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेशात महिलांचे सरासरी आयुष्य 66.8, तर केरळमध्ये महिलांची आयुर्मर्यादा 78.7 वर्षे आहे.
भारतातील 1990 पासून लोक काही प्रमाणात आरोग्याविषयी जागरुक झाल्याने 2016 साली केलेल्या सर्व्हेनुसार विविध आजार आणि इतर कारणांमुळे होणारा मृत्यू दर एक तृतीयांशवर पोहचला आहे. केरळ, गोवा या राज्यांत आरोग्यविषयक सुधारणा असून, उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये गरिबीमुळे लोकांच्या आरोग्यमानचा दर्जा सुधारलेला दिसत नाही.
29 राज्यांमधील अनारोग्य, अपंगत्व आणि अकाली मृत्यू यांना कारणीभूत असलेल्या घटकांचा अभ्यास करून विकास आणि साथरोग नियंत्रणाची पातळी याआधारे राज्यांचे चार गटांमध्ये विभाजन केले आहे.संसर्गजन्य, माता, नवजात आणि आहाराविषयक आजार, असंसर्गजन्य आजार आणि दुखापती यांमुळे आजारपण-अकाली मृत्यू यानुसार हे विभाजन करण्यात आले आहे.