केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला मे महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएची कामगिरी २०१९ आणि २०१४ च्या तुलनेत खराबच राहिली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्या, तर एनडीएला एकूण २९३ जागा मिळाल्या होत्या. यानंतर, आता मोदी सरकारला धाडसी निर्णय घेता येणार नाही, असे विरोधकांचे म्हणणे होते. मात्र, विरोधकांचे दावे फेटाळून लावत, भाजपने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मोदी ३.० कार्यकाळातील कामांसंदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
भाजपने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमाने मोदी सरकार ३.० च्या कार्यकाळातील कामगिरी संदर्भात माहिती देण्यात आली आहे. यात, सांगण्यात आले आहे की, "मोदी 3.0 चा कार्यकाळ कमकुवत असेल. आघाडी तुटेल, असे ते (विरोधी पक्ष) म्हणत होते..."
मोदी ३.० च्या कार्यकाळातील कामगिरी -भाजपने मोदी ३.० कार्यकाळातील कामगिरीची माहिती देताना म्हटले आहे, नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. पंजाब नॅशनल बँकेच्या १३,००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा भारतात प्रत्यार्पित. जमीन घोटाळ्यात ईडीने रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी केली. संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर. दिल्ली, महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुका जिंकल्या. आता समान नागरी संहितेचा (UCC) क्रमांक...
समान नागरी कायदा (UCC) म्हणजे काय?संविधानाच्या कलम ४४ अंतर्गत समान नागरी संहिता (UCC) एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. याचा उद्देश सर्व भारतीय नागरिकांना त्यांच्या विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक आणि मालमत्तेशी संबंधित वैयक्तिक बाबींसंदर्भात एक समान कायदा लागू करणे आहे. मग त्याचा धर्म, जात किंवा समुदाय कोणताही असो.