Whatsapp: गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्समुळे युझर अगदी त्रस्त झाले आहेत. याची दखल घेत केंद्र सरकारने यात पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय नंबरवरुन स्पॅम कॉल्स वाढत असल्याने भारतीय युझर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपला नोटीस पाठवण्यात येईल, असे आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्स ५० टक्के कमी करणार असल्याचे आश्वासन व्हॉट्सअॅपकडून देण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅप ही मेटाच्या मालकीची कंपनी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारतातील युझर्सना फसवणुकीचे कॉल्स मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला नोटीस पाठण्याची घोषणा केली होती. एका अहवालानुसार भारतामध्ये ४८७ दशलक्ष व्हॉट्सअॅप युझर्स आहेत.
आंतरराष्ट्रीय कॉल्स ५० टक्क्यांनी कमी होणार
यासंदर्भात व्हॉट्सअॅपने निवेदन दिले असून, यामध्ये नवीन विकसित केलेल्या प्रणालीमुळे सध्या येणारे आंतरराष्ट्रीय कॉल्स ५० टक्क्यांनी कमी होणार आहेत. तरीही आम्ही आणखी सुधारणा करुन वापरकर्त्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊ, असे आश्वासन व्हॉट्सअॅपकडून देण्यात आले आहे. मागील काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय कॉल्स वाढले आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याचा मोठ्या प्रमाणावर धोका आहे. हे कॉल्स इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशइया आदी देशांमधून येत आहेत. हे कॉल्स +251, +62, +254, +84 अशा क्रमांकावरुन येतात. अशा कॉल करणाऱ्यांवर प्रतिबंध करण्यात येत आहे. युजर्सना ब्लॉक आणि रिपोर्ट, असे पर्याय उपलब्ध असल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे.